पाडळीतील बेपत्ता व्यक्तीच्या खुनाचा गुन्हा उघड; एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखा व बोरगाव पोलिसांची कामगिरी

by Team Satara Today | published on : 15 November 2025


सातारा :  सातारा तालुक्यातील पाडळी गावातून गेल्या पाच महिन्यांपासून अचानकपणे बेपत्ता असलेल्या संभाजी बाळू शेलार (वय 43) यांचा गावातीलच माजी सैनिक असलेल्या भरत उर्फ मधू रंगराव ढाणे (वय 48) याने खून केल्याचे समोर आले असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा छडा लावला असून मधू ढाणे याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, 8 जून 2025 मध्ये पाडळी ( ता. सातारा) येथील संभाजी बाळू शेलार हे अचानक बेपत्ता झाले होते. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊन त्याबाबतची खबर दि. 22 जून रोजी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावेळी सर्व शक्यता पडताळून बोरगाव पोलिसांनी शेलार यांचा शोध घेतला होता. परंतु, ते मिळून आले नव्हते. या घटनेला जवळपास पाच महिने झाले असतानाच या गुन्ह्याचा समांतर तपास करणार्‍या एलसीबीच्या हाती मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर तपास करताना ही खुनाची घटना समोर आली आहे.

दि. 8 जून रोजी मृत शेलार व संशयित ढाणे हे बरोबर होते. त्यानंतर शेलार अचानक बेपत्ता झाले. याप्रकरणी बोरगावचे सपोनि संदीप वाळवेकर, सहाय्यक फौजदार प्रवीण शिंदे व डी. बी पथक शोध घेत होते. परंतु त्यात यश येत नव्हते. त्यांनी संशयित मधू ढाणे यालाही चौकशीसाठी बोलावले होते. पण त्यावेळी त्याने याचा मागमुस पोलिसांना लागू दिला नाही. पण ‘उलटा चोर कोतवाल को डाँटे’ या उक्तीप्रमाणे त्याने बोरगाव पोलिसांवरच तक्रारी अर्ज करून दबाव आणला होता.

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की हा खून मधु ढाणे यानेच केला आहे. तात्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर जवळपास पाचशेच्या पेक्षाजास्त वेळा प्रश्नांचा भडिमार केला. तेव्हा त्याने केलेल्या कृत्याचा पाढा वाचला व संभाजी शेलार यांच्या खुनाला वाचा फुटली.

या खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, रोहित फार्णे, संदीप वाळवेकर, पो.उ.नि. विश्वास शिंगाडे, पारीतोष दातीर, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, प्रवीण फडतरे, अमित माने, अरुण पाटील, अमित सपकाळ, गणेश कापरे, स्वप्नील कुंभार, अविनाश चव्हाण, ओंकार यादव, स्वप्निल शिंदे, अमित झेंडे, मोहन पवार, धिरज महाडीक, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, शिवाजी गुरव, पंकज बेसके बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार प्रवीण शिंदे, ज्ञानेश ढाणे, विशाल जाधव, समाधान जाधव, दीपक मांडवे, प्रशांत चव्हाण, सतिश पवार, निलेश गायकवाड यांनी सदरची कारवाई केली असुन 5 महिण्यापासुन मिसींग व्यक्तीचा खुनाचा संवदनशिल गुन्हा कौशल्यपूर्ण तपास करुन उघड करुन आरोपीस अटक केल्याबददल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.

असा झाला खुन व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

दि. 8 जून रोजी संभाजी शेलार यांचा मानेवर सुरीने वार करून खून केला. मृतदेह रात्रभर घरातच ठेवला आणि दि. 9 जून रोजी सकाळी संशयिताच्या घरामागे शेलार यांचे प्रेत जाळले. त्यानंतर उरलेली हाडे पोत्यात भरून गावाशेजारून वाहणार्‍या ओढ़याकाठी अडचणीत असणार्‍या विहिरीत टाकुन पुरावा नष्ट करण्याचा ढाणे याने प्रयत्न केला.

सपोनि गर्जेंचा पायगुण व फडतरे, बेबले, जगधनेंचे नेटवर्क कामी

सपोनि रमेश गर्जे नुकतेच पुन्हा एलसीबीत रूजू झालेत. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शन आणि गर्जेंचा पायगुण, एलसीबीचा ‘दो हंसो का जोडा’ प्रवीण फडतरे व शरद बेबले यांचे सातार्‍यासह शेजारील जिल्हयांमध्ये असणारे जबरदस्त नेटवर्क सोबत सपोनि रोहित फार्णे, हवालदार लक्ष्मण जगधने व सर्व टीमचे अथक परिश्रम खुन्यापर्यंत जाण्यास उपयुक्त ठरले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य सरचिटणीसपदी नरेश देसाई
पुढील बातमी
राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत खंडाळा संघ प्रथम; संघातील तिघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

संबंधित बातम्या