सातारा : हिंदवी पब्लिक स्कूलमधे आयोजित ‘सूर्यनमस्कार यज्ञात’ हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुलचा विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 1000 सूर्यनमस्कार सहजरित्या पुर्ण करून, राष्ट्रीय युवा दिन कुटुंबियांसमवेत उत्साहात साजरा केला. या उपक्रमात इयत्ता पाचवी व सहावीच्या एकूण 37 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पहाटे 5.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याने 1001 व आध्यापकांसह 40 हजारांहून अधिक सूर्यनमस्कार घातले.
या उपक्रमाची पूर्वतयारी कार्यकारी संचालिका, योग शिक्षिका सौ. रमणी कुलकर्णी, गुरुकुल प्रमुख संदीप जाधव, राहूल यांनी विद्यार्थ्यांकडून पुर्वसरावाद्वारे करून घेण्यात आली. हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुल ही बारा तासांची शाळा आहे. जिथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. शाळेत योगासने, प्राणायाम, गायन, वादन, चित्रकला इत्यादी कलागुण तसेच मैदानी खेळ अशा सर्व गोष्टीं दैनंदिन अभ्यासाबरोबर नियमित शिकवल्या जातात.
सूर्यनमस्कार यज्ञातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी समारोपप्रसंगी उपस्थित लक्ष्मी केशव प्रतिष्ठानचे संस्थापक विजयराव पंडीत याप्रसंगी म्हणाले की, सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. विद्यार्थी दशेत सूर्यनमस्काराचा सराव केल्याने स्नायू बळकट होतात. तसेच एकाग्रता वाढते. प्राणायामाचा अभ्यास होतो. भारतीय संस्कृती जतन करण्याचे हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुल चे कार्य कौतुकास्पद आहे.
या प्रसंगी बोलताना अध्यक्ष अमित कुलकर्णी म्हणाले, 12 जानेवारी हा राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जयंती दिन. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुलातील विद्यार्थ्यांचा सूर्यनमस्कार यज्ञ हा उपक्रम राबवण्यात आला ही अभिमानास्पद बाब आहे. या उपक्रमामागचे उद्दिष्ट आपल्या राष्ट्राचा एक सुजान, सुदृढ, सशक्त नागरिक या गुरुकुलातून निर्माण व्हावा, हे आहे.
उपक्रमाचा शुभारंभ पहाटे 5 वाजता हिंदवी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. मंजूषा बारटक्के, उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. उपक्रमामधे क्रीडा शिक्षक विनोद दाभाडे, निर्मला साळुंखे व हिंदवियन्सनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जोशी यांनी केले व आभार हेमलता जगताप यांनी मानले.