सातारा पालिकेतील शिस्तभंगावर ना. शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी; जनतेच्या कामात अडथळे सहन न करण्याचा इशारा

जनतेने विकासासाठी निवडून दिले; सभागृहात संघर्ष आणि आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी नाही

by Team Satara Today | published on : 17 May 2026


सातारा  : सातारा नगरपालिकेतील अलीकडच्या गदारोळानंतर भाजपमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला असून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांची तातडीची बैठक घेत पक्षातील शिस्तभंगावर कठोर नाराजी व्यक्त केली. शहर विकासाच्या मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करण्याऐवजी वैयक्तिक मतभेद आणि गटबाजी पुढे येत असल्याने त्यांनी संबंधितांना थेट शब्दांत सुनावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पालिकेतील सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळामुळे शहरात भाजपच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना, शिवेंद्रसिंहराजे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुढाकार घेतला. “जनतेने विकासासाठी निवडून दिले आहे. सभागृहात संघर्ष आणि आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी नगरसेवकांना जबाबदारीची जाणीव करून दिली.

बैठकीत शहरातील रखडलेली विकासकामे, स्वच्छतेच्या तक्रारी, पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात कोणतीही कुचराई चालणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. विशेषतः ठेके आणि कामांच्या वाटपावरून निर्माण होणाऱ्या वादांवर शिवेंद्रसिंहराजे यांनी नाराजी व्यक्त केली. “पालिकेतील कामे ही दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. कामांच्या गुणवत्तेशी तडजोड झाली तर संबंधितांवर कारवाई होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, साताऱ्याच्या आगामी विकास आराखड्याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत लवकरच समन्वय बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि नव्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

पालिकेतील अंतर्गत संघर्षामुळे भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात पक्षांतर्गत शिस्त आणि समन्वय वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवेंद्रसिंहराजेंच्या कठोर भूमिकेमुळे पालिकेतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून येत्या काही दिवसांत त्याचे परिणाम दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तमाशा कलावंत सौ. मंगला जावळे व हरी डावाळे यांना यावर्षीचा लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर पुरस्कार जाहीर
पुढील बातमी
सातारा शहरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा

संबंधित बातम्या