सातारा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत उज्ज्वल यश मिळविले आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (पाचवी) जिल्ह्यातील ३५, तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (आठवी) २३ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत. वाईचा वेदांत राहुल घोडके हा विद्यार्थी ३०० पैकी २९० गुण मिळवीत राज्यात दुसरा आला आहे, तर जिल्हा गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील ९४७ विद्यार्थी चमकले आहेत.
पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील ५८ विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यामध्ये शहरी विभागातील ३५ व ग्रामीण विभागातील २३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २० हजार १६२ विद्यार्थी प्रवेशित झाले होते. त्यापैकी सहा हजार १२८ विद्यार्थी पात्र झाले असून, त्याची टक्केवारी ३०.७० टक्के आहे. इयत्ता आठवी शिष्यवृत्तीसाठी १२ हजार ८३२ विद्यार्थी प्रवेशित झाले होते. त्यापैकी तीन हजार ५३३ विद्यार्थी पात्र झाले पान ७ वर असून, त्याची टक्केवारी २७.८८ आहे.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री विद्यालय वाई येथील वेदांत राहुल घोडके (इयत्ता आठवी) याने राज्य गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे. वाई येथील द्रविड हायस्कूलमधील आदित्य विक्रम तांबे (आठवी) राज्यात तिसरा, शिरवळ येथील ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालयातील संस्कार योगेश बोबडे (आठवी) राज्यात चौथा, वाई येथील नगरपालिका शाळेतील आरव विक्रम तांबे व प्रिशा सॅम्युअल गावित (पाचवी) शहरी भागातून गुणवत्ता यादीत अनुक्रमे, पाचवे, सातारा येथील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयातील जान्हवी सचिन जाधव (आठवी) शहरी भागातून राज्यात पाचवी, रहिमतपूर येथील आदर्श विद्यालयातील जिया अकबर आत्तार (आठवी) हिने राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे.