सातारा : सातारा शहराच्या वाढत्या पाणी गरजा लक्षात घेऊन राबविण्यात येत असलेल्या कास धरण उंचीवाढ प्रकल्पातील जलवाहिनीच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. कास धरणातून शहरापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी उभारण्यात आलेली जलवाहिनी जवळपास पूर्ण झाली असून, प्रकल्पाचे उर्वरित कामही वेगाने सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या प्रकल्पाच्या माध्यमातून सातारा शहराला भविष्यात अधिक प्रमाणात आणि नियमित पाणी उपलब्ध होणार असून, वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शहरात प्रस्तावित असलेल्या चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठीही हा प्रकल्प महत्त्वाचा आधार ठरणार आहे.
पाहणीदरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी पॉवर हाऊस, सांबारवाडी व आनावळे परिसरातील विविध कामांची माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांनी दर्जेदार कामासह प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष ॲड. दत्तात्रय बनकर, पाणीपुरवठा अधिकारी शहाजी वाठारे, दिग्विजय गाडवे तसेच संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.
साताऱ्याच्या जलसुरक्षेला मिळणार नवे बळ
कास धरण उंचीवाढ प्रकल्पामुळे सातारा शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला दीर्घकालीन स्थैर्य मिळण्याची अपेक्षा आहे. शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. जलवाहिनीचे काम पूर्णत्वास आल्याने अतिरिक्त पाणीसाठा शहरापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था सक्षम झाली असून, नागरिकांना अधिक नियमित व विश्वासार्ह पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.