सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. स्मिता योगेश जाधव यांना मदत करणार आहे. आम्ही महायुतीतच असून लवकरच मेळावा घेऊन यासंदर्भातील घोषणा केली जाईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिली.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी शनिवारी साताऱ्यातील विकासनगर येथे मंत्री मकरंद पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची माहिती देतानाच पदवीधरांच्या प्रश्नांबाबतचे व्हिजन आणि भविष्यातील योजनांवर ना. मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली. पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून या निवडणुकीत आपल्या पाठीशी ताकदीने उभे राहावे, असे आवाहन डॉ. स्मिता जाधव यांनी ना. पाटील यांना केले.
या भेटीदरम्यान ना. मकरंद पाटील यांनी डॉ. स्मिता जाधव यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. पदवीधर मतदारसंघासाठी त्यांनी मांडलेल्या संकल्पना आणि भविष्यातील योजनांची माहिती जाणून घेतली. यावेळी ते म्हणाले, डाॅ. स्मिता जाधव यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सकारात्मक आहे. आम्ही महायुतीतच असून डाॅ. स्मिता जाधव यांना मदत करणार आहे. यासंदर्भात लवकरच मेळावा घेतला जाईल. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी सक्रिय होण्याचे आवाहन केले जाणार असल्याने महायुतीची ताकद संघटितपणे दिसणार आहे. राष्ट्रवादीच्या पाठबळामुळे सातारा जिल्ह्यात महायुतीच्या प्रचाराला व्यापक स्वरूप मिळण्याची चिन्हे आहेत.
महायुतीची ताकद एकवटली
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीची ताकद एकवटण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही सकारात्मक भूमिका घेतली आहे. ना. मकरंद पाटील यांनी डॉ. स्मिता जाधव यांच्याशी चर्चा करून सोमवारी मेळाव्यात निर्णय जाहीर करण्याची ग्वाही दिल्याने महायुतीच्या प्रचाराला बळ मिळणार आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डाॅ. स्मिता जाधव यांना मदत करणार : ना. मकरंद पाटील; डॉ. स्मिता जाधव यांच्या शैक्षणिक कार्याचे केले कौतुक
by Team Satara Today | published on : 18 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा