सातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागामार्फत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सर्व 11 आगारातून जादा बसेस सोडणार आहेत. पुणे, मुंबई, बोरिवली, ठाणे या मार्गावर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बसेस सोडल्या जाणार आहेत. प्रवाशांनी जादा बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक विकास माने यांनी केले.
दि. 9 व 10 ऑगस्ट रोजी पुणे, मुंबई, बोरीवली, ठाणे येथून गावी येण्यासाठी मोठया प्रमाणात प्रवाशांची गर्दी होणार आहे. दि. 8 ऑगस्ट रोजी पुणे येथून स्वारगेट सातारा, कराड, सातारा, फलटण, वाई, पाटण, दहिवडी, महाबळेश्वर, वडूज व पुणे स्टेशन स्वारगेट मार्गावर 52 बसेस सोडण्यात येणार आहेत. दि. 9 ऑगस्ट रोजी 25 बसेस, दि. 10 ऑगस्ट रोजी 52 बसेस, दि. 11 ऑगस्ट रोजी 24 बसेस सोडण्यात येणार आहेत.
मुंबई येथून दि, 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून मुंबई सेंट्रल, सायन बोरिवली, ठाणे बोरिवली सातारा, कराड, कोरेगाव, फलटण, वाई, पाटण, दहिवडी, महाबळेश्वर, मेढा, वडूज अशा 25 फेर्या,दि. 9 ऑगस्ट रोजी 16, दि.10 रोजी 25, तसेच दि. 9 रोजी सातारा विभागातील सर्व आगारातून 39 बसेसच्या माध्यमातून 196 फेर्या होणार आहेत.