‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीची मागणी; साताऱ्यात ‘हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे आंदोलन

by Team Satara Today | published on : 27 April 2026


सातारा :  कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा तसेच इतिहासाचे विकृतीकरण झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला.

आंदोलनानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे पुस्तकाची विक्री व वितरण तात्काळ थांबवावे, संबंधित लेखक व प्रकाशकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ व १९६ अंतर्गत गुन्हे नोंदवावेत, तसेच पुस्तकाच्या डिजिटल आवृत्तींवर सायबर कायद्यांनुसार निर्बंध आणावेत, अशी मागणी करण्यात आली.

हिंदू जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे यांनी या पुस्तकातून शिवाजी महाराजांच्या कार्याचा अपमान झाल्याचा आरोप केला. इतिहासाचे चुकीचे चित्रण करून समाजात गैरसमज पसरवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. हिंदू महासभेचे अधिवक्ता दत्तात्रय सणस यांनी राष्ट्रपुरुषांचा अवमान सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत कठोर कारवाईची मागणी केली.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गुरूराज रसाळ यांनी शिवचरित्राची विकृती करणाऱ्या लिखाणाला विरोध कायम राहील, असे सांगितले. तसेच, हिंदू जनजागृती समितीचे हेमंत सोनावणे यांनी या पुस्तकामुळे तरुण पिढीमध्ये चुकीचा संदेश जात असल्याची चिंता व्यक्त केली. विश्व हिंदू परिषदेचे विजय गाढवे यांनी राष्ट्रपुरुषांच्या सन्मानाबाबत कोणतीही तडजोड मान्य केली जाणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

या आंदोलनात विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यातील २५०० दुकाने बंद; खत-बियाणे विक्रेत्यांचा संप पेटला; खरिपाच्या तयारीला फटका
पुढील बातमी
राजवाडा चौपाटीवर ‘स्वच्छता-शिस्त संहिता’ लागू; व्यावसायिकांची एकजूट :कठोर निर्णयांची अंमलबजावणी

संबंधित बातम्या