सातारा : जिल्ह्यातील सहकारी संस्थांची मातृसंस्था, आपल्या उत्तम प्रशासन, उत्कृष्ठ कार्यपध्दती व सुयोग्य नियोजनामुळे राज्यातच नव्हेतर देशात सहकार क्षेत्रातील बँकिंगमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चांगली प्रगती केलेली असून या बँकेची 75 वी वार्षिक साधारण सभा शनिवार दि. 16 रोजी खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तदनंतर सभेत समाजाशी, सहकार चळवळीशी, या बँकेशी बांधिलकी असणार्या, निधन पावलेल्या मान्यवर, कार्यकर्ते, बँक सेवक/माजी सेवक, तसेच देशासाठी धारातिर्थी पडलेल्या शूरजवान याशिवाय ज्ञात, अज्ञात मृत बँक खातेदार, बँकेचे हितचिंतक आदींना सभेने 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहिली.
याप्रसंगी बँकेचे संचालक ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी निवड झालेबद्दल बँकेचे संचालक मंडळाचेवतीने शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करणेत आला. सत्काराबद्दल उत्तर देताना ना. भोसले म्हणाले, बँकेच्या वाटचालीमध्ये माजी आजी संचालकांचे फार मोठे योगदान आहे. बँकेत कोणत्याही प्रकारचे राजकारण आणले जात नाही. या पदाच्या माध्यमातून जिल्ह्याचे प्रश्न सोडविणे तसेच बँकेचे काही प्रश्न शासन स्तरावर प्रलंबीत आहेत ते सोडविणेचा प्रयत्न करणार असलेचे सांगितले. बँकेची वाटचाल पुढे अशीच यशस्वीपणे सुरु राहील, अशी अपेक्षा व्यक्त करून मंत्रीपदी निवड झालेबद्दल सत्कार केलेबद्दल आभार व्यक्त केले.
बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील म्हणाले, बँकेच्या एकूणच दैदिप्यमान प्रगतीमध्ये बँक स्थापनेपासून नफ्यात असून बँकेस सतत ऑडीट वर्ग अ’, प्राप्त झाला आहे. बँकेचे निव्वळ एनपीए चे प्रमाण सलग 18 वर्ष ’शून्य’ टक्के आहे. बँकेची वसुलीची टक्केवारी कायमच 95 टक्केहून अधिक राहिलेली आहे. बँकेस नाबार्ड, केंद्र व राज्य शासन तसेच सहकारी बँकिंग क्षेत्रातील नामांकित संस्थांकडून आज अखेर 118 पुरस्कारांनी सन्मानित करणेत आले असून याचे सर्व श्रेय बँकेच्या सभासद व ग्राहकांना जाते. यानंतर बँकेच्या अहवाल सालातील प्रगतीचा, कार्याचा चौफेर आलेख सभेसमोर विषद केला. यामध्ये प्रामुख्याने बँक, शेतकरी सभासद, सर्वसामान्य सभासदांच्या हिताच्या दृष्टीने कार्यान्वित असलेल्या विविध कर्ज व ठेव योजना, सामाजिक बांधिलकी म्हणून राबवित असलेल्या विविध योजना, कृषि व ग्रामीण विकास योजना इ. चा उल्लेख करुन संकल्पपूर्तीची, भावी संकल्पाची माहिती दिली. अध्यक्ष यांचे अध्यक्षीय भाषणानंतर सभेचे कामकाज रीतसर पार पडले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वार्षिक साधारण सभेच्या विषयांचे वाचन केले. विषयानुषंगाने सांगोपांग चर्चा होवून सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. बँकेची वैशिष्टयपूर्ण कार्यप्रणाली, बँकेचे उत्कृष्ठ कामकाज, सक्षम व भक्कम आर्थिक स्थिती, बँकेच्या विविध व नाविन्यपूर्ण विकास योजना याबद्दल सभासदांनी बँकेच्या कामाची प्रशंसा करुन यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विकास संस्थांचे सभासदांनी विविध कर्ज योजना व कामकाजाचे अनुषंगाने असलेल्या अडीअडचणी संबंधी प्रश्न सभेत मांडले. तसेच काही सूचनाही केल्या. सभासदांनी केलेल्या सुचनाबाबत विचार केला जाईल. तसेच अडीअडचणी, बँकेच्या नवनवीन योजनासंदर्भात असलेल्या अडचणी, प्रश्न सोडवणूकीचे दृष्टीने बँकेचे संचालक मंडळ प्रयत्नशील राहील अशी ग्वाही अध्यक्ष यांनी दिली. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांचे/शंकांचे निरसन केले.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, बँकेची स्थापना 15 ऑगस्ट 1949 रोजी यशवंतराव चव्हाण, आर. डी. पाटील, आबासाहेब वीर या थोर विभूतींनी बँकेची स्थापना केली. बँकेचे अमृतमहोत्सवी वर्ष मागील वर्षी साजरे करणेत आले. बँकेस चांगली आर्थिक शिस्त आहे. संचालक मंडळाची चांगली ध्येय धोरणे व प्रशासकीय कामकाज या सर्व बाबतीत बँकेचे कामकाज चांगले आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये तीव्र स्पर्धा असून नवीन बदल घडत आहेत. आर्थिक क्षेत्रात शिस्त रहावी याकरीता आंतरराष्ट्रीय नॉर्म्सचा विचार करुन रिझर्व बँक कायदे करुन बँकांवर कडक निर्बंध लागू करीत असून ते सहकारी बँकांना सुध्दा लागू झालेमुळे बँकांनी गुणात्मक काम करणे गरजेचे आहे. विकास संस्थांनी चिकित्सक वृत्तीने काम करणे आवश्यक आहे. केंद्रशासनाने पॅक्स् कॉम्प्युटराझेशनचे काम हाती घेतले असून पहिल्या टप्प्यात आपल्या जिल्ह्यातील 933 विकास संस्थांचा समावेश आहे. विकास सेवा संस्थांचे संचालक मंडळाला आपले अधिकार व कर्तव्ये यांची जाणीव असली पाहिजे व संस्थेच्या कारभारात लक्ष घातले पाहिजे. सहकारी बँकांना शेतकर्यांच्या अडचणी, नैसर्गिक आपत्ती या बाबींचा विचार करुन त्यांना वित्त पुरवठा करावा लागतो. बँकेचे संचालक मंडळ नेहमी शेतकर्यांचे हिताचा विचार करते. शेतकर्यांना वारंवार कर्जमाफी देणे हा पर्याय नाही. शेतकर्यांना त्यांचे शेतीमधून अधिक उत्पादन घेता यावे याकरीता कृत्रिम बुध्दीमता हे तंत्रज्ञान शेतकर्यांना उपलब्ध करुन देणेचे बँकेने ठरविले आहे. शेतकर्यांना ठिबक सिंचनाकरीता अनुदान देणेचे ठरविले आहे. बँक परदेशात व देशातील उच्च शिक्षणासाठी शून्य टक्क्यांनी कर्ज उपलब्ध करून देते. बँकेची उत्तरोत्तर प्रगती होवो व ही बँक जगातील रोबो बँक म्हणून मॉडेल करणेसाठीची अपेक्षा व्यक्त केली.
सभेस महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व बँकेचे संचालक ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी सहकार मंत्री व बँकेचे संचालक बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपूरे, शिवरूपराजे खर्डेकर, प्रदीप विधाते, सुनील खत्री, ज्ञानदेव रांजणे, रामराव लेंभे, सुरेश सावंत, लहुराज जाधव, संचालिका सौ. कांचनताई साळुंखे, सौ. ऋतुजा पाटील, कार्यलक्षी संचालक संग्रामसिंह जाधव, जितेंद्र चौधरी, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, नाबार्ड साताराचे डी. जी. एम. सौ. दिपाली काटकर, बँकेचे कर सल्लागार तानाजीराव जाधव, बँकेचे वैधानिक लेखापरीक्षक पार्टनर कुलकर्णी, सतत व समवर्ती लेखापरीक्षक श्रीमती रेणु घाटगे, वि. का. स. सेवा सोसायटया, अर्बन बँका व पतसंस्था, गृहनिर्माण, ग्राहक व पाणी पुरवठा सहकारी संस्था, सहकारी खरेदी विक्री संघ, साखर कारखाने, दूध संस्था इत्यादि सहकारी संस्थांचे पदाधिकारी / प्रतिनिधी तसेच व्यक्ती सभासद पत्रकार बंधू उपस्थित होते.
बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी सभेस उपस्थित असलेल्या मान्यवर व सभासद प्रतिनिधींचे आभार मानले.