दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार फैजान अन्सारी या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने केली आहे. त्यांनी अभिजीत दीपके यांच्या विरोधात एफआयआर नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. फैजानने अभिजीत दीपके यांना पाकिस्तानी एजंट आणि उमर खालिदचे समर्थक म्हटले आहे, तसेच एका मीडिया संवादादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोपही केला आहे.
जर दीपके यांना अटक केली नाही, तर ते देशात दंगली भडकवू शकतात, असेही या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे. डीसीपी कार्यालयाबाहेर तक्रारीची प्रत दाखवत फैजान अन्सारी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, "आज मी अभिजीत दीपके यांच्या विरोधात डीसीपींकडे लेखी तक्रार दाखल केली आहे, कारण दीपके यांच्या माणसांनी माझ्यावर दोनदा हल्ला केला आणि माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. माझ्यावर पुणे आणि औरंगाबादमध्ये हल्ला झाला. मी तिथेही दोन गुन्हे दाखल केले आहेत. दीपके यांना तात्काळ अटक व्हावी अशी माझी इच्छा आहे." दिल्लीपोलिसांना सलाम करत फैजान म्हणाले की, सोनम वांगचुक यांना योग्य वेळी अटक करण्यात आली, यामुळे दिल्लीतील परिस्थिती अधिक बिघडण्यापासून वाचली. दीपके प्रत्येक गोष्टीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
तक्रारदाराचे अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप
फैजान यांनी डीसीपी कार्यालयात सादर केलेल्या लेखी तक्रारीत सीजेपीच्या संस्थापकाला पाकिस्तानी एजंट आणि उमर खालिदचा समर्थक म्हटले आहे. "अभिजीत हा पाकिस्तानी एजंट आणि उमर खालिदचा समर्थक आहे, अभिजीत दीपकेने बॉलिवूड सेलिब्रिटींना जंतर मंतरवर येण्यासाठी पैसेही दिले होते, असा गंभीर आरोप केला आहे. दीपकेंची तक्रार करण्यासाठी ते मुंबईहून दिल्लीला आले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी अद्याप या तक्रारीवर प्रतिसाद दिलेला नाही.