सातारा : दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना सर्वाच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या आनंदाप्रित्यर्थ्य सातारा आम आदमी पक्षाच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील आणि पदाधिकार्यांनी शिवतीर्थावर पेढे, साखरेचे वाटप करुन आनंद साजरा केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कथित दारू घोटाळ्यातील सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेही केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. ईडीच्या खटल्यात त्यांना आधीच जामीन मिळाला होता. आता सीबीआयच्या खटल्यातही त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. त्यामुळे आता त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबतची माहिती सातारा आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी शिवतीर्थाकडे धाव घेतली. याठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पोवई नाक्यावर नागरिकांना पेढे आणि साखरेचे वाटप करुन त्यांचे तोंड गोड करण्यात आले.
यावेळी बोलताना रतन पाटील म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दबाव टाकून, यंत्रणांचा वापर करुन रचित आणि खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातून विरोधकांचे फक्त पक्ष नेस्तनाबूत करण्याचे कारस्थान दिसून येत आहे. तसेच आम आदमी पार्टीमध्ये फूट पाडण्याचा कटही करण्यात आला. मात्र, भारताची न्यायव्यवस्था बळकट असल्याने केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या निकालामुळे भारतीय न्यायव्यवस्थेवरील आमचा विश्वास दृढ झाला आहे.
यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हा संघटक किरण पाटील, मारुती जानकर, सदस्य सुनिल वांगडे, हिंमत कणसे, माजी सरपंच महादेव जाधव, हणमंत चव्हाण, इंदुताई तुपे, साक्षी परामणे, प्राची परामणे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सुप्रीम कोर्टाकडून अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर
सातारा आम आदमी पक्षाकडून शिवतीर्थावर पेढे, साखरेचे वाटप
by Team Satara Today | published on : 13 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा