सातारा : नुकत्याच झालेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत सातारा विकास आघाडीने १९ जागांवर विजय मिळवला. निवडणुकीनंतर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना पाच अपक्ष तर तीन समर्थक उमेदवारांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे पालिकेत उदयनराजे गटाचे संख्याबळ २८ वर पोहचल्यामुळे साताऱ्यात फक्त उदयनराजे चालतात..... या त्यांच्यात डायलॉगचा प्रत्यय सातारकरांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, सभागृहातील संख्याबळ वाढल्यामुळे उदयनराजे यांच्या समर्थकांनी उपनगराध्यक्षपदासह अधिकच्या सभापतीपदासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.
सातारा नगरपालिकेच्या ५० जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजपच्या कमळ या चिन्हावर सातारा विकास आणि नगर विकास आघाडीच्या उमेदवारांनी ही निवडणूक लढवली. निवडणुकीपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नगराध्यक्षपदासाठी आग्रही भूमिका घेतली होती. हे पद नगर विकास आघाडीकडे गेल्यामुळे उदयनराजे भोसले प्रेमींमध्ये थोडीशी मरगळही पाहायला मिळाली होती.
या निवडणुकीच्या निकालामध्ये सातारा विकास आघाडीचे १९ उमेदवार विजयी झाले. त्यानंतर पाच अपक्ष तीन समर्थक आणि निवडून आलेल्या शिवसेनेच्या एका समर्थकाने पुणे येथील निवासस्थानी भेट घेऊन उदयनराजे भोसले यांना पाठिंबा दर्शवल्यामुळे उदयनराजे गटाचे संख्याबळ २८ वर पोहोचले आहे. सातारचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी अद्यापही नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला नाही. दुसरीकडे नगरपालिकेच्या सभागृहात संख्याबळ वाढल्यामुळे उदयनराजे प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उपनगराध्यक्ष पदासह सभापती पदे आपल्या गटाकडेच राहावे यासाठी त्यांनी उदयनराजेंकडे आग्रह धरला आहे. उपनगराध्यक्ष, पक्षप्रतोत, पाच स्वीकृत नगरसेवक, बांधकाम, पाणीपुरवठा, शिक्षण, विशेष मागासवर्गीय कल्याण आणि आरोग्य, महिला व बालकल्याण या सभापती पदांसाठी लवकरच वाटप होणार असून उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे या दोन्ही गटांकडून पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांना सभापती पदाची लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे.
पक्ष उमेदवार सागर पावशेही देणार उदयनराजेंना पाठिंबा
प्रशांत आहेरराव, सावित्री बडेकर, विनोद मोरे, मयूर कांबळे, जयश्री जाधव, संकेत साठे या अपक्ष उमेदवारांनी तर बिनविरोध निवडून आलेल्या आशा पंडित, सिद्धी पवार आणि शुभांगी काटवटे यांनीही उदयनराजे यांना पाठिंबा दिल्यानंतर आता सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले सागर पावशे हे सुद्धा उदयनराजे यांना पाठिंबा देणार असल्याचे वृत्त असून येत्या दोन दिवसात उदयनराजे यांना भेटून ते आपला पाठिंबा दर्शवतील असे खात्रीलायक वृत्त आहे.