बासुंदीच्या गुणवत्तेवर ग्राहकाचे प्रश्नचिन्ह; अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार, उत्पादनातून दुर्गंधी येत असल्याचा आरोप

by Team Satara Today | published on : 30 July 2026


सातारा : शहरातील एका दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्रातून खरेदी करण्यात आलेल्या बासुंदीच्या गुणवत्तेबाबत ग्राहकाने आक्षेप घेत अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. उत्पादनातून दुर्गंधी येत असल्याचा तसेच आवश्यक उत्पादनविषयक माहिती न दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महादरे (ता. सातारा) येथील राहुल आनंदराव जाधव यांनी सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी (दि. ३०) त्यांनी शुक्रवार पेठेतील बदामी विहीर परिसरातील हेगडे फूड प्रॉडक्ट्सच्या विक्री केंद्रातून बासुंदी खरेदी केली. संबंधित उत्पादन साध्या प्लास्टिकच्या पिशवीत देण्यात आले असून त्यावर उत्पादनाची तारीख, बॅच क्रमांक, वापरण्याची अंतिम मुदत तसेच इतर आवश्यक तपशील नमूद नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, घरी जाऊन बासुंदी उघडल्यानंतर त्यातून तीव्र उग्र वास येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तत्काळ विक्री केंद्रात जाऊन विचारणा केली; मात्र कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित उत्पादनाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात यावेत, उत्पादनाची गुणवत्ता तपासावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राहुल जाधव यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, राज्यभर अन्नभेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांविरोधात तपासणी मोहीम सुरू असताना साताऱ्यात आलेल्या या तक्रारीमुळे दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या तक्रारीवर अन्न व औषध प्रशासन कोणती भूमिका घेते आणि तपासणीनंतर काय निष्कर्ष समोर येतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या; साहित्य क्रांती ज्योत दिंडीचे सातार्‍यात जल्लोषात स्वागत
पुढील बातमी
जिल्हा बँक निवडणुकीची रंगीत तालीम सुरू; आखाडेतील घडामोडींनी राजकीय समीकरणांना वेग

संबंधित बातम्या