साताऱ्यात कॉलेज परिसरात वाहतूक नियमभंगाविरोधात कारवाई; सपोनि राजेश माने यांच्या नेतृत्वाखाली अचानक नाकाबंदी; 32 हजार 500 रुपयांचा दंड वसूल

by Team Satara Today | published on : 29 July 2026


सातारा : महाविद्यालयीन परिसरातील बेशिस्त वाहनचालनेला आळा घालण्यासाठी सातारा शहर वाहतूक शाखेने बुधवारी विशेष मोहीम राबवत वाय. सी. कॉलेज, छत्रपती शिवाजी कॉलेज आणि डी. जी. कॉलेज परिसरात अचानक नाकाबंदी केली. सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाईचे नेतृत्व केले. या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येऊन 32 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

महाविद्यालयीन परिसरात विनापरवाना वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास, हेल्मेटचा वापर न करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे तसेच मॉडिफाय सायलेन्सर बसवून ध्वनीप्रदूषण करणार्‍या वाहनांची संख्या वाढत असल्याच्या तक्रारी वाहतूक शाखेकडे येत होत्या. त्यानुसार पोलिसांनी अचानक तपासणी मोहीम हाती घेत अनेक वाहनांची पाहणी केली.

कारवाईदरम्यान नियमभंग करणार्‍या वाहनचालकांवर एम. व्ही. ऍक्टअंतर्गत 32 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यावेळी केवळ दंडात्मक कारवाई न करता विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगत सुरक्षित वाहन चालवण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी, अपघात टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर, वैध वाहन परवाना, वेगमर्यादेचे पालन आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे अत्यावश्यक आहे. वाहतुकीचे नियम पाळणे ही प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी आहे, असे सांगितले.

शहरातील महाविद्यालयीन परिसरांसह इतर संवेदनशील भागांतही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असून, नियमभंग करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले.

सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन आवश्यक

विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीची शिस्त रुजविणे ही काळाची गरज आहे. हेल्मेटचा नियमित वापर, ट्रिपल सीट प्रवास टाळणे, मोबाईलवर बोलत वाहन न चालविणे आणि वैध परवान्यासह वाहन चालविणे या सवयी अपघातांचे प्रमाण कमी करण्यास महत्त्वपूर्ण ठरतात. सुरक्षित वाहतूक ही सामूहिक जबाबदारी असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सासपडे येथे केबल वायरच्या वादातून बोरगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल
पुढील बातमी
नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास; आरोग्याच्या प्रश्‍नाकडे प्राधान्याने लक्ष दिल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण

संबंधित बातम्या