सातारा : सातारा शहरातील 273 कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्याचा दावा सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र तरीही 11 महिन्यांमध्ये निर्बिजीकरणाचे काम समाधानकारक नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी केली होती. त्यानुसार आयोजित बैठकीमध्ये मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी आरोग्य विभागाची चांगलीच कान उघाडणी केली व संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाका, अशी मागणी वाघमारे यांनी करताच त्यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन बापट यांनी दिले.
काही दिवसापूर्वी पिसाळलेले कुत्रे भटक्या बैलाला चावल्याने त्याचा करुण अंत झाला होता. सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी या संदर्भात सातारा नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येच्या संदर्भात त्यांनी सातारा पालिकेसमोर आंदोलन केले होते. या आंदोलनाला प्रतिसाद देऊन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी आरोग्य विभागाची तातडीची बैठक घेतली. या बैठकीला मुख्याधिकारी बापट यांच्यासह गणेश वाघमारे, आरोग्य अधिकारी प्रकाश राठोड, सागर बडेकर, उमेश खंडूझोडे, प्रशांत निकम इत्यादी उपस्थित होते.
आरोग्य विभागाला बापट यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. आरोग्य विभागाचे काम दर्जेदार झाले पाहिजे. तसेच नागरिकांच्या तक्रारी वेळोवेळी सोडवल्या गेल्या पाहिजेत, असे निर्देश त्यांनी दिले. व्ही केअर संस्थेकडून गेल्या 11 महिन्यांमध्ये कुत्र्यांच्या जन्मदराचे नियंत्रणाचे काम व्यवस्थित झालं नसल्याचा आरोप गणेश वाघमारे यांनी केला. मात्र गेल्या 11 महिन्यामध्ये तब्बल 273 कुत्र्यांचे जन्मदर नियंत्रण शस्त्रक्रिया झाल्याचा दावा मुख्याधिकारी बापट यांनी केला. त्यावेळी उपस्थित सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याच्या विषयावर बापट यांनी कारवाईचा शब्द दिला नाही, पण पुढील महिन्यांमध्ये या संस्थेचा ठेका संपत आहे. या संदर्भात कार्यवाही निश्चित केली जाईल आणि कामांमध्ये दिरंगाई करणार्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.