महाराष्ट्रातील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार- मंत्री शिवेंद्रराजे भोसले; मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उदघाटन

by Team Satara Today | published on : 19 April 2026


उदगीर  : महाराष्ट्रातील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने लढे दिले आहेत. उदगीर येथे होत असलेल्या या राष्ट्रीय अधिवेशनात पत्रकारांच्या अनेक प्रश्नांचा उहापोह होईल. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करु, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री तथा मराठी पत्रकार परिषदेच्या उदगीर येथील राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

महाराष्ट्रातील पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते. व्यासपीठावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, लोकमत वृत्तपत्र समूहाचे संपादक राजेंद्र दर्डा, आ. संजय बनसोडे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, विश्वस्त शरद पाबळे, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, सदस्य चंद्रसेन जाधव, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, महिला आघाडीच्या अध्यक्ष शोभा जयपूरकर, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, जिल्हाधिकारी भारत बस्तेवाड, जिल्हा पोलीस प्रमुख अमोल तांबे, उदगीरच्या नगराध्यक्षा स्वाती हुडे, प्राचार्य डॉ. सुधीर जगताप उपस्थित होते.

मंत्री शिवेंद्रराजे भोसले पुढे म्हणाले, एस. एम. देशमुख, किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी मराठी पत्रकार परिषदेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पत्रकारांच्या आरोग्याची काळजी वाहणारी संघटना म्हणून मराठी पत्रकार परिषदेची ओळख आहे. पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच कारकिर्दीत आला. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी एस. एम. देशमुख यांनी केली आहे. याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करु. प्रचंड मोठा वारसा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन मी पालकमंत्री असलेल्या उदगीरमध्ये होत आहे. याचा मला अभिमान आहे. या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रश्नांवर चर्चा होईल ती सगळी निवेदने माझ्याकडे द्या आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे याबाबतची बैठक लावून हे प्रश्न मार्गी लावू. मुंबई गोवा महामार्गाबाबत मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने आंदोलने केली आहेत. या प्रश्नावरही आता तोडगा निघत आहे. लवकरच हा महामार्ग सुकर होईल, असेही ना. शिवेंद्रराजेंनी सांगितले.

ना. बाबासाहेब पाटील म्हणाले, मुद्रित माध्यमांचे महत्त्व कधी कमी होणार नाही. लोकांचा आजही वर्तमानपत्रावरील विश्वास आढळ आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोठे योगदान आहे. त्यामुळे आम्ही मंत्रिमंडळाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावू.

राजेंद्र दर्डा म्हणाले, पत्रकार म्हणून बातमी वेगाने दिलीच पाहिजे. मात्र प्राधान्य वेगाला द्यायचा की सत्याला हे लक्षात ठेवले पाहिजे. सोशल मीडिया ही एक मोठी संधी आहे. त्याचवेळी अनेक वेळा ते मोठे आव्हान ठरत आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने मांडलेल्या पत्रकारांच्या निवृत्तीवेतन व आरोग्य विषयक प्रश्नांची दखल शासनाने घ्यावी, असे दर्डा म्हणाले.

आ. संजय बनसोडे म्हणाले, उदगीर येथे होत असलेले अधिवेशन आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. येथील पत्रकार भवनासाठी आम्ही चार कोटी रुपये दिले आहेत. आता उदगीर जिल्ह्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने आम्हाला पाठिंबा द्यावा.

एस. एम. देशमुख म्हणाले, राज्य सरकारने पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. छत्रपती घराण्याचे वंशज असलेले शिवेंद्रराजे भोसले यांनी यात पुढाकार घ्यावा. ज्येष्ठ पत्रकारांना सुलभपणे पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी सरकारने पावले उचलावी. अधीस्वीकृत्तीचे नियम किचकट आहेत त्या जाचक अटी शिथिल कराव्यात.

हरीश पाटणे म्हणाले, मराठी पत्रकार परिषदेने स्वागताध्यक्ष पदाची संधी आमच्या राजांना दिली ही सन्मानाची बाब आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शिवेंद्रराजे निश्चितपणे महाराष्ट्रातील पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावतील.

यावेळी मिलिंद आष्टीवकर, सुरेश नाईकवाडे, सुधीर जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. अनिता  येलमट्टे, रसूल पठाण यांनी सूत्रसंचालन केले. स्वागत सचिन शिवशेट्टे यांनी केले. प्रारंभी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. अधिवेशनात चांद्यापासून बांद्यापर्यंत पत्रकार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

हरीश पाटणे ठोकतातही आणि मैत्रीही निभावतात : शिवेंद्रराजे यांचे कौतुकोद्गार

मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात स्वागत अध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांचे कौतुक केले. ते म्हणाले, ज्यांच्यामुळे या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पद मी स्वीकारले ते आमचे मित्र हरीश पाटणे. त्यांनी व मी आजवर वर्षोनुवर्षे मैत्री निभावली आहे. मित्र आहे म्हणून त्यांनी मला बातम्यातून ठोकायचेही सोडले नाही आणि जेंव्हा मित्राला मदतीची आवश्यकता असते तेव्हा त्यांनी मला हातभारही लावला आहे. पत्रकार आणि आमदार व मित्र आणि आमदार ही दोन्ही नाती वेगवेगळी आहेत. आम्ही दोघांनीही ती जपली आहेत या पुढेही ती जपणार आहोत, अशा शब्दात शिवेंद्रराजेंनी कौतुकोद्गार काढले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यातील कृषि निविष्ठा विक्रेत्यांवर कृषि विभागाची कारवाई; 8 परवाने निलंबित
पुढील बातमी
मराठा साम्राज्य विस्तार नकाशा वगळल्याने साताऱ्यात शुक्रवारी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन - छत्रपती वृषालीराजे, सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

संबंधित बातम्या