पारगावात थारच्या अपघातानंतर फलटणच्या तरुणीचा धुमाकूळ; मदतीला धावलेल्या नागरिकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

by Team Satara Today | published on : 27 August 2026


खंडाळा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव हद्दीत भरधाव थार जीप संरक्षक कठड्याला धडकून झालेल्या अपघातानंतर फलटण येथील तरुणीने घटनास्थळी जोरदार धुमाकूळ घालत नागरिकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तरुणीच्या या अरेरावीमुळे महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

​पुणे बाजूकडून सातार्‍याच्या दिशेने जाणारी थार जीप पारगावजवळ रस्त्याकडेला असणाऱ्या लोखंडी संरक्षक रेलिंगला जाऊन जोरदार धडकली. अपघाताचा आवाज ऐकताच मदतीसाठी स्थानिक ग्रामस्थ आणि महामार्गावरील प्रवासी तात्काळ घटनास्थळी धावून गेले. त्यावेळी अपघातग्रस्त जीप लोखंडी कठड्यात पूर्णपणे अडकल्याने चालक ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. उपस्थित नागरिकांनी 'गाडी क्रेनच्या मदतीशिवाय निघणार नाही, थांबा' अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग आल्याने गाडीत बसलेल्या फलटण येथील तरुणीने थेट मदतीसाठी आलेल्या नागरिकांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तिने उपस्थित ग्रामस्थांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत अरेरावी सुरू केल्याने परिसरात गोंधळ उडाला.

​घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संबंधित तरुण-तरुणींना शांत केले. यानंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त थार जीप बाजूला काढून महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस हवालदार चंद्रकांत धापते पुढील तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पैगंबरांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन व शिरखुर्म्याचे वाटप; माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि खिदमत-ए-खल्कतर्फे आयोजन
पुढील बातमी
नेपाळमधील महापुरात महाबळेश्वरच्या १० महिला पर्यटक अडकल्या; पोखरा येथील हॉटेलमध्ये सर्वजण सुरक्षित

संबंधित बातम्या