सातारा : जिल्ह्यात शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने दमदार कारवाई करत अवैध अग्नीशस्त्रांसह एका युवकाला जेरबंद केले. या कारवाईत दोन देशी बनावटीच्या पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुमित युवराज साठे (वय २२, रा. साजुर, ता. कराड) याला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार सुरज उर्फ चिक्या जगन्नाथ मोहीते (रा. सोहोली, ता. कडेगाव, जि. सांगली) हा फरार आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी विशेष पथकाची स्थापना करून कारवाईचे आदेश दिले होते.
दरम्यान, पोलीस निरीक्षक घोडके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कराड-पाटण रोडवरील दुर्गामाता हॉटेल परिसरात एक युवक अवैध पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने सापळा रचला.
संशयित इसमाला पकडण्याचा प्रयत्न करताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन देशी बनावटीच्या पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने ही शस्त्रे साथीदाराकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.
या प्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (१), २५, ५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, महेंद्र जगताप यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व कराड तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली. या कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व अंमलदारांचे वरिष्ठांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.