सातारा : खंडोबाचा माळ ते मनाली हॉटेल या दरम्यान एका रिक्षाचालकाने बेदरकारपणे वाहन चालवत सहा दुचाकी व चारचाकींना धडक दिली. त्याला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सातारा वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचाऱ्याला चालकाने खेचून शंभर मीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेत त्या महिला पोलीस जखमी होऊन रक्तबंबाळ झाल्या असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रिक्षाचालकाने मद्यप्राशन करून वाहन चालवले. वाहतूक शाखेतील महिला पोलीसांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न करताच चालकाने त्यांच्या हाताला पकडून रिक्षा वेगाने चालवली. त्यामुळे त्या रस्त्यावर बराच वेळ ओढल्या गेल्या. यावेळी परिसरात मोठी धावपळ उडाली.
या घटनेमुळे साताऱ्यातील वाहतूक शिस्तीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रिक्षाचालकांकडून वाहतुकीचे नियम मोडणे, प्रवाशांशी उर्मटपणे वागणे, दारू पिऊन वाहन चालविणे, तसेच महिलांना त्रासदायक टोमणे मारणे अशी प्रकरणे वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत सातारा प्रादेशिक परिवहन विभागाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.