नीट परीक्षेतील घोळाने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर; परीक्षेनंतर ही निकालात घोळ

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पुन्हा घेतलेल्या नीट परीक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

by Team Satara Today | published on : 19 July 2026


सातारा (श्रीरंग काटेकर) : नॅशनल टेस्टिंग एजन्सी नवी दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष सन२०२६ नीट परीक्षेत पेपर फुटीचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला होता. याचा नाहक त्रास देशभरातील असंख्य विद्यार्थ्यांना सोसावा लागला होता. पेपर फुटी मुळे देशांतर्गत शैक्षणिक क्षेत्रात उठलेले वादळ शांत होत नाही तोच नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पुन्हा घेतलेल्या नीट परीक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. 

नीट परीक्षेला बसलेले हजारो विद्यार्थ्यांना पुन्हा या परीक्षेला सामोरे जावे लागले होते. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहून दिवसरात्र परिश्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाहिलेले असंख्य स्वप्न पुन्हा निकालानंतर घडलेल्या परीक्षेतील गोंधळामुळे धुळीला मिळाले आहेत. नीटची परीक्षा नीट झालीच नसल्याचे निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. निकालातील गुणपत्रकातील धक्कादायक गोंधळामुळे पुन्हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील अनेक शहरात विशेषता महाराष्ट्रातील बीड,छत्रपती संभाजीनगर,पुणे,मुंबई सह अन्य शहरातील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या ओ. एम. आर. सीटवर दाखवलेले गुण आणि अंतिम गुणपत्रिकेतील गुण यामध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. 

सावळा गोंधळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान 

हा तांत्रिक दोष म्हणावा का.... का विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी चाललेला खेळ म्हणावा.. हेच काही विद्यार्थी पालकांना उमजत नाही. नीट परीक्षे मधील सातत्याने होत असलेल्या या सावळा गोंधळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होत आहे त्याचबरोबर त्यांच्या मानसिकतेवरही गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी च्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागला आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या परीक्षा घेण्याच्या कार्यप्रणाली विषयी प्रश्नचिन्ह

परीक्षेतील घोळ सपता संपेना पेपर फुटीचे गालबोट लागलेल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीमुळे देशभरातील हजारो विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पुन्हा घेतलेल्या परीक्षेत सुरक्षिततेची पूर्ण खबरदारीं घेऊनही व यावर कोट्यावधी रुपये खर्च करूनही पुन्हा जैसे थैच स्थिती झाल्याचे निकालानंतर सिद्ध झाले आहे. यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या परीक्षा घेण्याच्या कार्यप्रणाली विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

नीटच्या गुणपत्रिकेतील ही घोळ चव्हाट्यावर 

राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी नीट परीक्षेच्या पेपर फुटी मुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेला गालबोट लागले आहे. पेपर सेटिंग करणारेच फितूर होत असल्याने या व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे. नैतिक मूल्याचे झालेले अधिपतन यामधून सिद्ध होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर होण्याचे स्वप्न ठेवून विद्यार्थी मात्र दिवस-रात्र परिश्रम घेत असतात. अशा स्वप्नांना या व्यवस्थेतील दलाल मात्र खो घालतात हे खरंतर दुर्दैव आहे. सन२०२६ मधील पेपर फुटीबरोबरच नीटच्या गुणपत्रिकेतील ही घोळ चव्हाट्यावर आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपी 24 तासांत जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
पुढील बातमी
विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार; नूतन जिल्हा कार्यकारिणीच्या पदग्रहणानंतर तेजस्विनी घोरपडे यांची भूमिका

संबंधित बातम्या