सातारा : शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या, दि. 15 रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत. शिवसेनेचा भव्य मेळावा सातारा शहरात आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यात ना. शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, हा मेळावा महत्त्वपूर्ण मानला जात असून, या निमित्ताने शिंदे गटाचे कार्यकर्ते चार्ज होणार आहेत.
सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे चार, शिंदे गटाचे दोन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका या महायुतीतून लढवल्या गेल्या. आता राज्यातील जिल्हा परिषदा, पालिका व महापालिकांच्या निवडणुकांमध्ये कोणता राजकीय फॉर्मुला वापरायचा, याची महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा अद्याप झालेली नाही. मात्र, तिन्ही पक्षांची स्वबळाची चाचपणी सुरू आहे. याची झलक शिंदे गटाच्या मेळाव्यात दिसणार आहे. शिंदे गटाचा सातार्यातील हा पहिलाच मेळावा असून, ना. एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना कोणता मंत्र देणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.
महायुतीचे तिन्ही घटक पक्ष पालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सक्रिय झाले आहेत. शिंदे गटाने राजकीय प्रचाराची गती वाढवली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समन्वयाने या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी पश्चिम महाराष्ट्रात गटाच्या बांधणीवर जोर दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाचा वरचष्मा राहील, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. सातार्यात भाजपशी समन्वय राखून, आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी मिळावी, या दृष्टीने आखणी सुरू आहे.
एकनाथ शिंदे यांचे सकाळी 10 वाजता सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर आगमन होणार आहे. तेथून पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, एकनाथ शिंदे हे कट्टर समर्थक नीलेश मोरे यांच्या संपर्क कार्यालयाला भेट देतील. तेथून कार्यकर्त्यांची रॅली हुतात्मा स्मारकाकडे जाणार आहे. तेथे हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून, एकनाथ शिंदे हे मेळाव्याच्या ठिकाणी जाणार आहेत.