सातारा तालुक्यामध्ये एकूण 62 उमेदवारांची माघार; 46 उमेदवार रिंगणात : शिंदे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार

by Team Satara Today | published on : 27 January 2026


सातारा  : सातारा तालुक्याच्या आठ गट आणि 16 गणाच्या राजकीय समीकरणांमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 62 उमेदवारांनी राजकीय विनंतीला मान देऊन आपली तलवार म्यान केली. तर गटासाठी 46 उमेदवार रिंगणामध्ये अंतिम राहिल्या असून यामध्ये 24 पुरुष आणि 22 महिला उमेदवारांचा समावेश आहे.

सातारा तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना कुठे अपक्ष तर कुठे शिंदे गट यांनी आव्हान दिले होते. सातारा विधानसभा मतदारसंघातील सातारा व जावळी या दोन तालुक्यांमध्ये शिंदे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. शेवटच्या दिवशी अनेक मतदारांना फोनाफोनी करून नेत्यांनी अर्ज माघारी घेण्याची विनंती केली तर काही ठिकाणी उमेदवार अचानक गायब झाल्याने कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ झाली .सातारा तालुक्यातील सोळा गणांमधून दाखल 143 अर्जांपैकी सुमारे 62 उमेदवारांनी राजकीय विनंतीला मान देऊन माघार घेतली तर 46 उमेदवार हे रिंगणात राहिलेले आहेत . नागठाणे गणामध्ये जास्त चुरस होती. येथे राजकीय शिष्टाई करून 11 उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास भाग पाडण्यात आले. त्या खालोखाल अतीत गणातून पाच जणांनी माघार घेतली. परळी खोऱ्यातून सुद्धा सहा जणांची माघार हा चर्चेचा विषय ठरली आहे. लिंब पाठखळ आणि शिवथर या तीन गानातून प्रत्येकी तीन उमेदवारांनी माघार घेतली आहे.


सातारा जिल्ह्यातील सातारा तालुका तसेच विधानसभा निहाय सातारा व कराड उत्तर मधील एकूण आठ गटातून 102 उमेदवारांनी माघार घेतली आहे यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी केलेल्या यशस्वी शिष्टाईचा परिणाम दिसून आला .नागठाणे पाठखळ, खेड, परळी, कोडोली या पाच महत्त्वपूर्ण गटांमध्ये नेत्यांनी राजकीय फिल्डिंग लावली होती. शेवटच्या दिवशी सातारा पंचायत समितीच्या आवारामध्ये अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची गर्दी झाली होती. अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रांत आशिष बारकुल यांच्याकडे याबाबतच्या नोटिसा देण्यात आल्या. 

नागठाणे गटातून एकूण दहा उमेदवारांनी माघार घेतली. यामध्ये अनेक अपक्ष बंडखोरांचा धोका होता. तो थोपवण्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाला यश आले. राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या खेड गटामधून लक्ष्मी दादासाहेब ओव्हाळ, आशा दिलीप कांबळे, पूजा कैलास गायकवाड, भाग्यश्री मोहन माने, प्रियंका कैलास संकपाळ या पाच उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे येथील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संदीप शिंदे यांच्या मते विभागणीचा धोका कमी झाला आहे. कोंडवे गटातूनराष्ट्रवादीचे गणेश निंबाळकर शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे श्रीकांत पवार, अपक्ष अजय गुजर व सूर्यकांत घोरपडे यांनी माघार घेतली. कोंडवे गटातील राष्ट्रवादीची माघार ही आश्चर्यकारक मानली जात आहे शिवथर गटातून शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे हनुमंत चौरे यांनी माघार घेतली .त्यामुळे ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांपुढे शरणागती करण्याची चर्चा सुरू झाली आहे. 

.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अनिल पाटील, रंगराव पाटील, काका कोयटेंना गुंफण पुरस्कार; आपुलकी प्रतिष्ठान, युवराज गाडवे, डॉ. विजयंता भुरले, संदेश नवले यांचाही समावेश
पुढील बातमी
विंटेज कार प्रदर्शनाला खासदार उदयनराजे यांची भेट; कार रॅलीला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संबंधित बातम्या