दिल्लीमध्ये कॉंग्रेसचे ‘इंदिरा भवन’ नवीन मुख्यालयाचे उद्घाटन

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरामध्ये कॉंग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने पुढे आलेला दिसून आला. त्याचबरोबर कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये देखील चांगला बदल झालेला दिसून आला आहे. यानंतर दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालयाचा पत्ता देखील बदलण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाने मागील 47 वर्षांचा जुना पत्ता बदलला आहे. कॉंग्रेस पक्षाचे नवीन मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

कॉंग्रेस पक्षाचे दिल्लीमध्ये नवीन मुख्यालय उभारण्यात आले आहे. कॉंग्रेसच्या या नवीन मुख्यालय हे ‘इंदिरा भवन’ म्हणून ओळखले जाणार आहे. काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी दिल्लीतील पक्षाच्या नवीन मुख्यालय उद्घाटन केले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी आणि पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

काँग्रेसने आज (दि.15) त्यांचे नवीन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. यापुढे पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय हे दिल्लीतील 9A कोटला रोड येथे असणार आहे. गेल्या 47 वर्षांपासून 24 अकबर रोड येथे कॉंग्रेस मुख्यालय होते. 24 अकबर रोड आणि कॉंग्रेसचे 139 वर्षांचे महत्त्वपूर्ण नाते आहे. तसेच इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी बुधवारी पाच मजली मुख्यालयाचे उद्घाटन केले. यामुळे कॉंग्रेस पक्षासाठी एक नवीन अध्याय सुरू होईल. आता पक्ष कार्यालय लुटियन्स दिल्ली येथून हलवले जाईल. नवीन इमारतीची पायाभरणी सोनिया गांधी यांनी 28 डिसेंबर 2009 रोजी केली. कॉंग्रेसचे हे नवीन मध्यवर्ती कार्यालय हे अत्याधुनिक सेवांनी युक्त असणार आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि कॉंग्रेस पक्षाला नवीन उंचीवर नेणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या नावाने कॉंग्रेसचे नवे मुख्यालय ओळखले जाणार आहे.

कसे असणार इंदिरा भवन?

आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे इंदिरा भवन असणार आहे. इमारतीच्या अगदी मध्यभागी स्वागत कक्ष बांधला आहे. रिसेप्शनच्या मागे एक कॅन्टीन क्षेत्र तयार केले आहे. तळमजल्याच्या डाव्या बाजूला एक हाय-टेक पत्रकार परिषद कक्ष आहे. काँग्रेसच्या मीडिया प्रभारींचे कार्यालयही याच बाजूला आहे. कार्यक्रमांसाठी पहिल्या मजल्यावर हाय-टेक ऑडिटोरियम बांधण्यात आले आहेत. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिकाऱ्यांची कार्यालये असतील. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी स्वतंत्र ऑफिस असणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी विभाग आणि डेटा विभागासाठी स्वतंत्र खोल्या असतील. टीव्हीवरील वादविवादांमध्ये सहभागी होणाऱ्या प्रवक्त्यांसाठी छोटे ध्वनीरोधक कक्ष तयार करण्यात आले आहेत. याच्या शेजारीच पत्रकार आणि कॅमेरामनसाठी बैठकीच्या खोल्याही बनवण्यात आल्या आहेत. नवीन मुख्यालयात अनेक जुन्या पक्ष नेत्यांचे फोटो देखील लावले आहेत.

मागील बातमी
युक्रेनवर रशियाचा एकाचवेळी 100 ठिकाणी हल्ला
पुढील बातमी
सार्वजनिक बांधकाम विभागाची सर्व कामे अधिकाधिक दर्जेदार व्हावीत

संबंधित बातम्या