उंब्रज : मागील वर्षी खून केल्यानंतर सातत्याने गुंगारा देणार्या संशयितास जेरबंद करण्यात उंब्रज पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी वेशांतर केल्यानंतरही चाहूल लागल्यानंतर संशयिताने जंगल परिसरात पलायन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी पाठलाग करून संशयिताला ताब्यात घेण्यात यश मिळविले.
सुरज संपत साळुंखे (वय 29, रा. नागठाणे ता. सातारा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाटण तालुक्यातील तारळे परिसरात उंब्रज पोलीस ठाण्याच्या तारळे दूरक्षेत्रातातील कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून करून पलायन केलेला संशयित सुरज साळुंखे हा तारळे जंगलवाडी रोड परिसरात उभा असल्याची माहिती उंब्रज पोलिसांना समजली. या माहितीनंतर पोलिसांनी वेशांतर करून त्या परिसरात पोहचले होते. त्यावेळी पोलिसांची चाहूल लागताच संशयित जंगलाच्या दिशेने पळून गेला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी संशयिताचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यास पकडून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. तसेच संशयिताला उंब्रज पोलिसांनी वडूज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.