सातारा : सुमारे 30 वर्षांपूर्वी फलटण शहरात उभारण्यात आलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. वेणुताई चव्हाण या दाम्पत्याचा जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील पहिल्या संयुक्त पुतळ्याची (स्मारक) गेल्या दशकभरापासून दुर्दशा झालेली होती. स्मारकालगतच डुकरांचा, श्वानांचा आणि गाढवांचा मुक्त वावर होता. ही दुर्दशा पाहून येणारे-जाणारेही हळहळत होते. मात्र, फलटण पालिकेला आणि स्थानिक पुढार्यांनाही त्याचे काहीएक सोयरसुतक नव्हते. शेवटी फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी आज दि. 11 रोजी श्रमदान करुन या स्मारक परिसराची स्वच्छता केली. त्यामुळे गेल्या दशकभरात अडगळीत पडलेल्या या पुर्णाकृती पुतळ्याला झळाळी मिळाल्याने स्व. चव्हाण दाम्पत्याच्या या स्मारकाने मोकळा श्वास घेतला.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे माजी उप पंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तथा भाग्यविधाते स्व. यशवंतराव चव्हाण या उत्तुंग विचारांच्या भूमीपुत्राला आपल्या मरणानंतरही यातना सोसाव्या लागताहेत आणि ते केवळ आणि केवळ फलटण नगरपालिका व स्थानिक पुढार्यांमुळे. परंतू 30 वर्षांपूर्वी हे स्मारक उभे करणार्या कै. यशवंतराव चव्हाण व कै. सौ. वेणुताई चव्हाण संयुक्त स्मारक समितीला पुतळा उभारणीनंतर भविष्यात असे काही होईल, असे स्वप्नातही वाटले नसावे. त्यामुळेच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, स्थानिक नेते स्व. सुभाष शिंदे, ऍड. सौ. विजयमाला राजेभोसले यांच्या अधिपत्याखाली पुतळा संयुक्त स्मारक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार फलटण शहराचे प्रवेशद्वार असणार्या जिंती पूल नाक्यावर दि. 27 सप्टेंबर 1994 रोजी या महाराष्ट्रातील पहिल्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. वेणुताई चव्हाण यांचा हा महाराष्ट्रातील पहिला वहिला व आतापर्यंतचा संयुक्त पुतळा लाखो-कोट्यवधी लोकांनी पाहिला असेल. परंतू, महाराष्ट्राच्या भाग्यविधात्याचा हा पुतळा गेल्या काही दशकांपासून अडगळीत पडला होता. संबंधित संयुक्त स्मारक समितीने यासंदर्भात फलटण पालिका तसेच तत्कालीन फलटणमधील सत्ताधार्यांना अनेकदा पत्रव्यवहार करुनही संबंधितांनी याकडे कानाडोळा केला.
यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात केलेले सत्तेचे विकेंद्रीकरण राज्यातील अनेकांना रुचलेले नव्हते. यामध्ये महाराष्ट्रातील काही संस्थानिक घराणीही होती. त्यापैकीच एक म्हणजे फलटणचे. त्यांनीही यशवंतरावांवर अशाप्रकारे सूड उगवला, हे म्हणणे वावगे नसावे. त्यामुळेच यशवंतराव-वेणुताईंचे हे स्मारक अडगळीत पाडण्याचे श्रेय खर्या अर्थाने यांनाच द्यावे लागेल.
फलटण ही स्व. यशवंतराव चव्हाणांची सासुरवाडी. त्यांच्या पत्नी स्व. वेणुताईंचा जन्म फलटणमधील. त्यामुळेच फलटणकरांना या दाम्पत्याबद्दल विशेष प्रेम व आदर राहिलेला आहे. परंतू या दाम्पत्याचे स्मारक अडगळीत पडल्यानंतर याबद्दल ब्र शब्द काढण्याचे धाडस आजच्या पिढीला झाले नाही. याचा विशेष खेद वाटला पाहिजे. फलटण येथील बेडके (सूर्यवंशी) कुटूंब, सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख, पंकज पवार, सचिन बेडके (सूर्यवंशी), महेंद्र बेडके (सूर्यवंशी) आदी मंडळी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती तसेच पुण्यतिथी दिनी पुतळा आणि परिसर स्वच्छ करुन या संयुक्त पुतळ्याला अभिवादन करतात. त्यामुळे का होईना, या संयुक्त स्मारकाचे पावित्र्य टिकून आहे.
गेल्या पाच दशकांमध्ये राज्यातील विविध राजकीय पक्षांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा वापर करुन राजकारण केले. त्यांच्या नावावर सत्ता भोगली. परंतू प्रत्यक्षात मात्र यशवंतराव चव्हाणांवरील प्रेम हे फलटणमधील स्मारकाच्या निमित्ताने बेगडी असल्याचेच सिद्ध झाले. आज दि. 11 रोजी फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेजच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्मारक व परिसराची स्वच्छता केली व पाण्याने पुतळा धुवून या पुतळ्याला पुष्पहार घालून खर्या अर्थाने या स्मारकाला न्याय देण्याचे काम केले. यशवंतराव चव्हाणांच्या नावावर राजकारण करुन राजकीय पदे भोगणार्यांना मात्र या कृतीने सणसणीत चपराक दिलेली आहे.
स्मारक हस्तांतरणाला पालिकेचा कोलदांडा!
स्व. यशवंतराव व स्व. वेणुताई यांच्या फलटणमधील स्मारकाला उणीपुरी तीन दशके पुर्ण झाली आहेत. पहिले सर्व काही सुरळीत होते. परंतू फलटणमध्ये 1995 साली राजकीय सत्तांतर होताच या स्मारकाला नजर लागली. जाणीवपूर्वक या स्मारकाला अडगळीत टाकण्याचा प्रयत्न केला गेला. गेल्या अनेक वर्षांपासून कै. यशवंतराव व कै. सौ. वेणुताई चव्हाण संयुक्त स्मारक समितीतर्फे पुतळ्याचे सुशोभिकरण तसेच नूतनीकरण करण्यासाठी संबंधित स्मारकाचा फलटण नगरपालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी कागदोपत्री पाठपुरावा केला जात आहे. अलिकडेच म्हणजे 14 जून 2024 रोजी या स्मारकाच्या हस्तांतराबाबत समितीने पालिकेकडे लेखी पत्रव्यवहार केला होता. तरीही यासंदर्भात पालिकेकडून कसल्याही प्रकारची कार्यवाही केल्याबाबत दिसून येत नाही. म्हणजेच जाणीवपूर्वक फलटण पालिका या हस्तांतरणाला कोलदांडा घालित असल्याचा आरोप फलटणमधील यशवंतप्रेमींनी केला आहे.