सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात सध्या सुरू असलेल्या महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सवात सातारा येथील गुरु प्रतीक सदामते यांच्या ब्लू नोट गिटार क्लासेसच्या वीस कलाकारांनी सातारकर प्रेक्षकांची संध्याकाळ विविध वाद्यांच्या वादन सादरीकरणाने मंत्रमुग्ध केली.
महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सवात चंद्रशेखरेंद्र सरस्वती कला मंदिर रंगमंचावर ..नाद श्रुती.. या कार्यक्रमांमध्ये सादर झालेल्या विविध भक्ती गीतांच्या सुरेख सांगीतिक कार्यक्रमाची सुरुवात कलाकारांनी ..तुझं मागतो मी आता ..या लता मंगेशकर यांनी गायलेल्या आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या विघ्नहर्ता गणेशाला वंदन करून केली. त्यानंतर ..लोटस फिट.. या रचनेवर सुरेख वादन कार्यक्रम सादर होऊन अमर प्रेम या हिंदी चित्रपटातील आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या ..रैना बिती जाये.. या लता मंगेशकर यांच्या अविट गळ्यातून सादर झालेल्या गाण्याची सुरेख पेशकश कलाकारांनी केली. त्यानंतर ग. दि. माडगूळकरांच्या गीत रामायणातील सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या. कुश लव रामायण गाती.. या गीताचे सुरेख सादरीकरण कलाकारांनी केले. त्यानंतर एल. सुब्रमण्यम व ग्राफेली यांची शास्त्रीय संगीतातील वायलीन आणि गिटार वरची एक रचना सादर करताना कलाकारांनी आपल्या वादन साधनेची ओळखच उपस्थित श्रोत्यांना करून दिली.
त्यानंतर प्रयागराज मध्ये होत असलेल्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ..बत्ती गुल मीटर चालू ..या चित्रपटातील गंगा नदीवर आधारित ..हर हर गंगे ..हे सुरेख गीत कलाकारांनी सादर केले. त्यानंतर सुप्रसिद्ध संगीतकार पंडित रविशंकरजी यांनी हिंदुस्तानी संगीतात रचलेला तराना यामध्ये पर्शियन व अरेबिक ध्वनींवर आधारित शब्द असतात लय आणि शब्दाच्या अनोख्या वापरासाठी प्रसिद्ध असलेला हा तराना सादर करून कलाकारांनी विठ्ठल भक्ती वर आधारित.. माऊली माऊली.. या गीतावर आपली पेशकश केली. गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या गीताला अजय - अतुल यांनी संगीतबद्ध केले होते, आणि चित्रपट होता लय भारी.
या वादन कार्यक्रमात ब्लू नोट गिटार क्लासेसचे गुरु प्रतीक सदामते यांच्याबरोबर विजय साळुंखे, अनुजा बोकील, यश केंजळे, आणि डॉ. जयदीप रेवले यांनी लीड गिटार वादन केले तर बेस गिटार वर होते रवी साप्ते आणि रिदम गिटार वर रुद्र सपकाळ, आर्यन उत्तेकर, अद्वैत ढवळीकर, आरोही मांडोवारा, अनन्या लिपारे, आयुष् काटकर, चीदघन कवारे, ईशान भोसले, गीत परदेशी, सई कर्वे, शरयू साखरे, श्रेया डोंगरे, वेदश्री देशपांडे, शुभांगी घाडगे यांनी वादन केले. तर तबला साथ निशांत सपकाळ यांची होती. या सर्व वादन कार्यक्रमानंतर या सर्व कलाकारांचा सत्कार नटराज मंदिराच्या वतीने संयोजिका सौ.उषा शानभाग,सौ.राजश्री शिंदे यांचे हस्ते करण्यात आला वादन कार्यक्रम सुरू असताना सातारा शहर परिसरातील विविध शाळेतील शालेय बालचित्रकरांनी आपली चित्रे रेखाटत महाशिवरात्रीचा आनंद वाढविला.
या चित्रकारांमध्ये रामानुज शिंदे, वेदांत शिंदे, पायल शिंदे, साहिल पाटील, व शहानंद बाचणकर या कलाकारांनी सहभाग घेतला..याप्रसंगी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अतुल देशपांडे यांनी केले. याप्रसंगी रमेश शानभाग, वासुदेवराव नायर, सौ.उषा शानभाग, व्यवस्थापक चंद्रन, नारायण राव यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.