सातारा : सातारा शहराचे भूषण असलेल्या भैरोबा मंदिर परिसरात रविवारी शिवतेज ग्रुप आणि दीपक अवकिरे मित्र समूहाच्या वतीने व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवून परिसर चकाचक करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मद्यपींनी उच्छाद मांडला असून, ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या आणि कचरा पडलेला होता. यामुळे भाविक आणि पर्यटकांच्या भावना दुखावत होत्या. ही बाब लक्षात घेऊन शिवतेज ग्रुप आणि दीपक अवकीरे मित्र समूहाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत शेकडो बाटल्या आणि प्लॅस्टिकचा २० पोती कचरा गोळा केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या की, "हा परिसर सातारच्या अस्मितेचा भाग आहे. येथे मद्यपान करून बाटल्या टाकणे हे अत्यंत निंदनीय आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणांचे पावित्र्य राखावे."