पाटण : पाटण तालुक्यात बेसुमार व अनधिकृत माती उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. दि.२ जून रोजी पकडलेल्या दोन डंपरचालकांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व गौण खनिज नियमांनुसार प्रत्येकी २ लाख १५ हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पहिल्या कारवाईत दि. २ रोजी सकाळी १० वाजता नेरळे गावच्या हद्दीत डंपर क्रमांक एमएच-०८-एपी-१७६५ मधून तीन ब्रास मातीची अनधिकृत वाहतूक करताना नेरळे ग्राम महसूल अधिकारी यांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी येरफळे येथील ज्ञानदेव तुकाराम गावडे यांना तहसीलदार अनंत गुरव यांनी दि. ४ जून रोजी नोटीस बजावली. त्याच दिवशी दुसऱ्या कारवाईत सकाळी १० वाजताच मौजे मल्हारपेठ हद्दीत डंपर क्रमांक एमएच-११-एएल-२४८८ मधून तीन ब्रास मातीची अनधिकृत वाहतूक करताना मल्हारपेठ ग्राम महसूल अधिकारी यांनी पकडले. याप्रकरणी येराड येथील धनराज आनंदराव साळुंखे यांना देखील दि. ४ जून रोजी नोटीस बजावण्यात आली.
दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ व गौण खनिज उत्खनन नियम २०१७ नुसार कारवाई करण्यात आली. गौण खनिजाचे बाजारमूल्य प्रति ब्रास ९०० रुपये, रॉयल्टी प्रति ब्रास ६०० रुपये, बाजारमूल्याच्या पाच पट दंडाची रक्कम तसेच वाहनांवरील २ लाख रुपये शास्ती मिळून प्रत्येकी २ लाख १५ हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांत लेखी खुलासा सादर न केल्यास ही दंडाची रक्कम मान्य आहे असे गृहीत धरून पुढील कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.