सातारा : खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर जाऊन चार वर्षांहून अधिक काळ फरार असलेल्या भरत कांतीलाल ओसवाल (रा. गुलमोहोर कॉलनी, शाहुपुरी, सातारा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी शाहुपुरी चौक परिसरातून अटक केली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू होती. त्याअंतर्गत पोलीस निरीक्षकविश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
भरत ओसवाल हा शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून आणि कौटुंबिक छळाच्या (भादंवि कलम 302 व 498-अ) गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. 14 मे 2020 रोजी तो 45 दिवसांच्या पॅरोलवर कारागृहाबाहेर आला होता. कोविड-19 काळातील विशेष सवलतींमुळे त्याने रजेचा कालावधी वाढवून घेतला. मात्र, 19 मे 2022 रोजी कारागृहात परत हजर राहणे बंधनकारक असतानाही तो गैरहजर राहिला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 172 व 224 अन्वये स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला.
फरार घोषित झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले. आरोपी वारंवार ठिकाणे बदलत आणि वेशांतर करत असल्याने त्याचा शोध घेणे आव्हानात्मक ठरत होते. गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण तसेच त्याच्या नातेवाईक व परिचितांच्या संपर्कातून पोलिसांनी त्याचा माग काढला.
विश्वसनीय माहितीच्या आधारे बुधवारी शाहुपुरी चौकात सापळा रचून पोलिसांनी भरत ओसवाल याला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी त्याला शाहुपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, सुजित भोसले, पृथ्वी जाधव, रोहित निकम आणि महेश निर्मळ यांनी केली. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी पथकाचे कौतुक केले.