पाटणकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

by Team Satara Today | published on : 26 May 2025


पाटण : राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेही उपस्थित होते. त्यांच्या भेटीमुळे भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. 

विधानसभा निवडणुकीत पाटण मतदारसंघात सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव झाला. त्यानंतर झालेल्या आभार मेळाव्यात विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशासाठी आग्रही भूमिका घेतली होती. खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही पाटणकरांनी भारतीय जनता पक्षात यावे, यासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून पाटणकरांच्या भाजप प्रवेशाच्या फक्त चर्चा होत होत्या.

नवीन साखर कारखान्याचे उद्‌घाटन, चाचणी गळीत हंगाम प्रारंभ यानिमित्ताने सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मुंबई आणि दिल्ली फेऱ्या वाढल्या होत्या. नुकतीच सत्यजितसिंह पाटणकर यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.

कार्यकर्त्यांची आज बैठक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटणकर गटाची उद्या (सोमवार) दुपारी बारा वाजता श्रीराम मंदिर, पाटण येथे पाटण विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीस माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, माजी सभापती राजाभाऊ शेलार, हिंदुराव पाटील, कोयना शिक्षण संस्थेचे संचालक याज्ञसेन पाटणकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेश पवार, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, पाटण खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, दूध संघाचे अध्यक्ष सुभाषराव पवार, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण आदी मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यात पावसाची संततधार
पुढील बातमी
ठाण्यात मागील 24 तासांमध्ये 11 कोरोनाबाधितांची नोंद

संबंधित बातम्या