माकडाची अचानक दुचाकीवर झडप

भीषण अपघात : पती ठार, पत्नी जखमी

by Team Satara Today | published on : 12 September 2025


महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा रस्त्यावर गुरुवारी एक हृदयद्रावक घटना घडली. चिखली गावच्या हद्दीत एका माकडाने अचानक दुचाकीवर झडप घातली आणि भीषण अपघात घडला. या अपघातात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

मृत व्यक्तीचे नाव आनंद सखाराम जाधव (वय ५०, रा. देवळी, ता. महाबळेश्वर) असे आहे. गुरुवारी संध्याकाळी ते पत्नीसमवेत महाबळेश्वरहून देवळीकडे दुचाकीवरून निघाले होते. तापोळा रस्त्यावर चिखली परिसरात पोहोचताच अचानक एका माकडाने दुचाकीवर झडप घातली. ही घटना इतकी अचानक घडली की जाधव यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी घसरली.

अपघातात पती-पत्नी दोघेही रस्त्यावर कोसळले. आनंद जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महाबळेश्वर आणि परिसरात माकडांचा वाढता उपद्रव ही मोठी समस्या बनली आहे. पर्यटनस्थळे, मुख्य बाजारपेठा आणि रस्त्यांवर माकडांचा मुक्त वावर सुरू असतो. हे माकड पर्यटकांकडून अन्न हिसकावणे, गाड्यांवर उड्या मारणे, रस्त्याच्या मधोमध बसणे यामुळे अपघातांचा धोका वाढवतात. 

स्थानिक नागरिक आणि पर्यटक यांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी वन विभागाकडे आणि स्थानिक प्रशासनाकडे माकडांच्या वाढत्या उपद्रवावर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यातील खुले करण्यात आलेले पाणंद रस्ते GIS नकाशावर उपलब्ध
पुढील बातमी
माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरा

संबंधित बातम्या