सातारा : खाजगी कंपनीकडून सातारा जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. ग्राहकांना या स्मार्ट मीटरची माहिती दिली जाणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले जाऊ नयेत. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
कृष्णा नगर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले. शिवसेनेचे शेतकरी सेना प्रमुख प्रताप जाधव, सातारा तालुका प्रमुख रमेश बोराटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय नलावडे, सातारा तालुका संघटक प्रणव सावंत, खटाव तालुका प्रमुख संजय नांगरे, सातारा शहर प्रमुख गणेश अहिवळे, युवा सेना शहर प्रमुख एडवोकेट शिवेंद्र ताटे, ईश्वरकृष्ण वाघमोडे, ज्ञानेश्वर नलावडे, सुनील पवार, आकाश धोंडे, आझाद शेख, चंद्रकांत पोळ, संजय जाधव, असलम शिकलगार, संजय नलावडे, संजय नागरे आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
या आंदोलनाविषयी बोलताना प्रताप जाधव म्हणाले, सातारा जिल्ह्यात खाजगी कंपनी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवत आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे व्यवसायिकांचे आणि नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे. सातारा जिल्ह्यात आपल्या माध्यमातून नेमलेल्या खाजगी कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. जे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जातात त्याची येत्या दहा दिवसात योग्य ती चौकशी करावी आणि मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवण्यात यावी. अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने आंदोलन करावे लागेल. यातून कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण होईल त्यासाठी वीज वितरण कंपनी जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला आहे.