नवी दिल्ली : भारतीय सुरक्षा दलांविरुद्ध आणि सामान्य जनतेवर २६हून अधिक भीषण हल्ले घडवून आणणारा कुख्यात माओवादी कमांडर मदवी हिडमा अखेर एन्काऊंटरमध्ये मारला गेला आहे. सुरक्षा दलांनी नक्षलवादाविरोधात मिळवलेले हे आजवरचे सर्वात मोठे आणि निर्णायक यश मानले जात आहे.
आंध्र प्रदेशातील अल्लुरी सितारामराजू जिल्ह्याच्या मरेदुमिल्लीच्या घनदाट जंगलात आज सकाळी आंध्र प्रदेश पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. हा परिसर आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेवर असल्याने तो नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला बनला होता. सकाळच्या वेळी सुरू झालेल्या या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर गोळीबार केला. यात हिडमासह एकूण सहा माओवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. ठार झालेल्यांमध्ये हिडमाची पत्नी राजाक्का हिचाही समावेश आहे. नक्षलवादाच्या कणा मोडणाऱ्या या कारवाईची माहिती आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक (DGP) हरीश कुमार गुप्ता यांनी दिली आहे.
हिडमाचा क्रूर चेहरा
'पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी'चा प्रमुख असलेला हिडमा, माओवादी संघटनेच्या केंद्रीय समितीतील सर्वात तरूण सदस्य होता. अवघ्या ४४ वर्षांच्या या नक्षलवादी नेत्यावर तब्बल ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
त्याने घडवून आणलेल्या हल्ल्यांतील क्रूरता भारताच्या इतिहासाला चटका देणारी आहे :
• २०१० दंतेवाडा हत्याकांड: या भीषण हल्ल्यात ७६ सीआरपीएफ जवान शहीद झाले होते.
• २०१३ जिरम घाटी हल्ला: या हल्ल्यात काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह २७ लोकांचा बळी गेला होता.
देशभरात नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, सुरक्षा दलांनी केलेली ही कारवाई उर्वरित माओवादी नेत्यांसाठी एक स्पष्ट संदेश आहे की, हिंसेच्या मार्गाचा शेवट विनाशच आहे. असे प्रतिपादन केन्द्रीय गृह मंत्र्यांनी केलं आहे.