कळंबोली येथे टेम्पोने धडक दिल्याने माण तालुक्यातील दोघांचा मृत्यू; मोटेवाडी, पर्यंती परिसरात हळहळ

by Team Satara Today | published on : 29 October 2026


सातारा : माण तालुक्यातील वरकुटे-म्हसवड हद्दीतील मोटेवाडी येथील मोटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कळंबोली, नवी मुंबई येथे खाजगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करत असताना पहाटेच्या सुमारास कोंबडी वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पोने धडक दिल्याने सौ. संगिता पोपट मोटे आणि खासगी ट्रॅव्हल्सचा ड्रायव्हर माण तालुक्यातील पर्यती गावचा सुपुत्र सुदर्शन सरतापे जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात पोपट धोंडीबा मोटे यांच्या पायाला व डोक्याला दुखापत झाली असून, या घटनेमुळे मोटेवाडी, पर्यंती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोपट धोंडीबा मोटे व त्यांच्या पत्नी सौ. संगिता मोटे हे मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्सने कळंबोली, नवी मुंबई येथे जाण्यासाठी निघाले होते. बुधवारी पहाटे सुमारे तीन वाजता ट्रॅव्हल्स कळंबोली येथे थांबल्यानंतर मोटे दाम्पत्य खाली उतरून आपले साहित्य काढत होते. त्याचवेळी कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पोने त्यांना धडक दिली. या भीषण अपघातात सौ. संगिता मोटे आणि ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हर सरतापे जागीच मृत्यू झाला, तर पोपट मोटे जखमी झाले.
पोपट धोंडीबा मोटे यांचे कळंबोली, नवी मुंबई येथे सोने-चांदीचे दागिन्यांचे दुकान आहे. मुलाच्या लग्नासाठी मुलगी पाहण्याच्या निमित्ताने ते आले होते. त्यानंतर ते पुन्हा कळंबोली येथे परतले असताना त्यांच्यावर हा दु:खद प्रसंग ओढवला. घटनेची माहिती मिळताच कळंबोली, नवी मुंबई पोलीस ठाण्याचे संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अभद्र युती चिरायु होवो !
पुढील बातमी
दहिवडीत बाजार समिती परिसरात गोडाऊनला भीषण आगीत मोठे नुकसान; आग विझवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न

संबंधित बातम्या