जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

by Team Satara Today | published on : 03 October 2025


सातारा : जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीच्या गणांसाठी आरक्षणाची सोडत १३ ऑक्टोबरला काढली जाणार असून, त्यावरील हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम आरक्षण ३१ ऑक्टोबरला निश्‍चित केले जाणार आहे. 

जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता जागा निश्चित करण्यासाठी प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्तांकडे सहा ऑक्टोबरपर्यंत पाठविले जाणार आहेत. 

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता राखीव जागांच्या प्रस्तावास आठ ऑक्टोबरपर्यंत मान्यता देण्यात येईल. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी आरक्षणाची सोडत १३ ऑक्टोबरला काढली जाईल.

प्रारूप आरक्षणाची अधिसूचना १४ ऑक्टोबर प्रसिद्ध केली जाईल. जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना १४ ते १७ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहेत. प्राप्त प्रारूप आरक्षणावरील हरकती व सूचनांच्या आधारे अभिप्रायासह गोषवारा विभागीय आयुक्तांना २७ ऑक्टोबरपर्यंत सादर केला जाईल. प्रारूप आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून आरक्षण अंतिम करणे ३१ ऑक्टोबरपर्यंत निश्‍चित करणे व अंतिम आरक्षण शासन राजपत्रात तीन नोव्हेंबरला प्रसिद्ध केले जाणार आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात विजयादशमीचा पारंपारिक सोहळा उत्साहात
पुढील बातमी
कोयना धरणात 173.21 टीएमसी पाण्याची आवक

संबंधित बातम्या