सातारा : राजगुरुनगर, ता. खेड येथे गोसावी समाजाच्या दोन पीडित मुलींवर अत्याचार करून त्यांची दुर्दैवीरित्या हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी गोसावी समाजाच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष भूपाल घाडगे, राजकुमार घाडगे, शिवाजी गोसावीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
नेताजी पडियार, निवास घाडगे, संतोष घाडगे, तसेच गोसावी समाजाचे बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. हा मोर्चा जिल्हा परिषदेच्या सिग्नल चौकातून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. राजगुरुनगर खेड वाडा रोड येथे गोसावी समाजाच्या दोन पिडीत मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली. बियर शॉपी मध्ये काम करणार्या एका नराधामाने हे भयंकर कृत्य केले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्यांक समाजावर सातत्याने अत्याचार होत आहेत. गृह मंत्रालयाने अशा प्रकरणांच्या संदर्भात समिती स्थापन करून या प्रकरणांचा सोक्षमोक्ष लावावा आणि या समितीला कायदेशीर बळ देऊन त्याला कन्या समिती नाव द्यावे. राजगुरुनगर प्रकरणातील संबंधित आरोपींना तत्काळ अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या घटनांमध्ये एसआयटी व सीबीआय चौकशीची सुद्धा मागणी करण्यात आली आहे. बर्याचदा हे विषय दाबले जातात आणि त्यातून नवीन नराधम तयार होतात. जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत उपोषण व आंदोलने ही सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी जयराज घाडगे, सतीश घाडगे, काली घाडगे, अर्जुन घाडगे व पांडुरंग घाडगे या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.