रहिमतपूर : आगामी नवरात्रोत्सव शांततेत, सुरक्षित व निर्विघ्न वातावरणात पार पडावा, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या वतीने आज जातीय दंगा नियंत्रण रंगीत तालीम व शहरातून रूट मार्च आयोजित करण्यात आला.
रहिमतपूर येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर ‘जातीय दंगा नियंत्रण रंगीत तालीम’ घेण्यात आली. सण-उत्सवाच्या काळात उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करता यावा, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देता यावा आणि पोलीस दलाची कार्यतत्परता व सज्जता कायम राहावी, या उद्देशाने ही रंगीत तालीम आयोजित करण्यात आली.
रंगीत तालीम पूर्ण झाल्यानंतर रहिमतपूर शहरातून पोलीस दलाचा रूट मार्च काढण्यात आला. क्रीडा संकुल येथून सुरू झालेला हा रूट मार्च दर्गा मस्जिद, गांधी चौक ,एस.टी. स्टँड, शिवराज चौक व शाही मस्जिद या मार्गाने रहिमतपूर पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आला.
या रूट मार्चच्या माध्यमातून आगामी नवरात्रोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रहिमतपूर पोलीस दल सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात रहिमतपूर पोलीस ठाण्याकडील १ पोलीस अधिकारी, १५ पोलीस अंमलदार व २१ होमगार्ड, असे एकूण ३७ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
आगामी नवरात्रोत्सव सर्व नागरिकांनी पारंपरिक उत्साहात, सामाजिक सलोखा, बंधुभाव व परस्पर सहकार्याच्या भावनेतून शांततेत साजरा करावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह किंवा तेढ निर्माण करणाऱ्या संदेशांपासून दूर राहावे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रहिमतपूर पोलीस दल सज्ज; ‘दंगा काबू रंगीत तालीम’ व शहरातून रूट मार्च
by Team Satara Today | published on : 10 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा