सातारा : राज्यात सर्वत्र मे महिन्यापासून जोरदार अतिवृष्टी सुरू असून शेतकऱ्यांबरोबरच रोजंदारी काम करणाऱ्या मजुरांच्या हाताला काम उरलेले नाही. राज्य सरकारने तात्काळ शेतकरी आणि शेतमजुरांना रोजंदरी काम करणाऱ्यांना शासकीय मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी पुरोगामी होलार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीशराव माने, सदस्य मकरंद केंगार यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी एक वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील तहसीलदार कार्यालयात महसूल नायब तहसीलदार उदयसिंग कदम यांची भेट घेतली व निवेदन सादर केले तसेच वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.
मे महिन्यापासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शेतमजुरांच्या अतोनात हाल होत आहेत. रोजंदारी करणाऱ्यांच्या हातांना काम राहिलेले नाही. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून राज्य सरकारने त्यांना तातडीने मदत करावी. शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत सरसकट शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माने यांनी केली.
यावेळी दादासाहेब केंगार, श्रीयश अहिवळे, सचिन कोडगार, मकरंद केंगार, मोहन आवटे, ज्ञानेश्वर कोडगार, विजय मोरे लक्ष्मण वाघमारे प्रकाश केंगार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.