मुंबई : कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. आशियामध्ये कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. हाँगकाँगपासून सिंगापूरपर्यंत कोरोनाच्या नव्या व्हायरसनुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. अशातच मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दोन संशयित कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये दोन संशयित कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही रुग्णांचे मृत्यूपूर्वी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा पुनःशिरकाव झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दोन्ही रुग्णांचा मृत्यू त्यांच्या आधीपासून असलेल्या गंभीर आजारांमुळे झाला आहे. मृतांमध्ये 58 वर्षीय कर्करोगग्रस्त महिला आणि 13 वर्षीय मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त मुलगी यांचा समावेश आहे, असे स्पष्टीकरण हॉस्पिटल प्रशासनाने दिले आहे.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या मृत्यूमागे थेट कोरोना कारणीभूत असल्याचं म्हटल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आरोग्य यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, आशियाई देशांमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. हाँगकाँगमध्ये सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोविड चाचणीसाठी डॉक्टरांकडे जाणारे आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येत देखील वाढ झाली आहे.
सिंगापूरमध्ये 28 टक्के रुग्णवाढ झाली असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एका आठवड्यात 14200 नवीन रुग्ण समोर आले आहेत. सुदैवाने, नवीन स्ट्रेन गंभीर नाही, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. दुसरीकडे गायक ईसन चानला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे तैवानमधील कॉन्सर्ट रद्द करण्यात आले आहे.
चीन व थायलंडमध्येही वाढते रुग्णसंख्या
चीनमध्ये रुग्णालयांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पुन्हा वाढले
थायलंडच्या रोग नियंत्रण विभागानेही वाढ नोंदवली
भारताची स्थिती काय?
भारतामध्ये सध्या 93 सक्रिय रुग्ण असून, गेल्या आठवड्यात 58 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. विशेष म्हणजे देशात चाचण्या कमी झाल्या असतानाही रुग्णसंख्या वाढत आहे, ज्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.
भीती नको – जागरूक राहा, खबरदारी घ्या!
मास्क वापरणे
हात स्वच्छ ठेवणे
गर्दीपासून दूर राहणे
ताप, सर्दी, खोकला असल्यास त्वरित चाचणी