- आजन्म विद्यार्थी : ज्ञानदीप डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रा. डॉ. सुभाष वाघमारे -प्रकाशक ,साहित्यवेल प्रकाशन सातारा ९८९०७२६४४०
७ नोव्हेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजेच विद्यार्थी दिन. ७ नोव्हे.१९०० मध्ये सातारा येथे इंग्रजी पहिलीत भीमराव रामजी आंबेडकर यांनी प्रवेश घेतला होता. त्यापूर्वी ते कॅम्प स्कूल मराठी शाळेत शिकले आहेत.. पण पुरावे मिळत नाहीत. शोध घेण्याची जबाबदारी आपली आहे. ज्या मुलाला शाळेत स्वतःच्या हाताने पाणी पिण्याची मुभा नव्हती, त्याने पुढे कोट्यवधी माणसांच्या हक्कांना घटनात्मक संरक्षण देण्यात मोलाची भूमिका बजावली. वर्गात वेगळे बसावे लागणारा विद्यार्थी जगातील नामवंत विद्यापीठांत ज्ञानसाधना करून समतेचा मार्गदर्शक झाला. अपमानाची वेदना, अन्यायाची चिकित्सा आणि परिवर्तनाची धडपड यांना जोडणारा हा प्रवास म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन. ७ नोव्हेंबरच्या विद्यार्थी दिनानिमित्त त्यांच्या ज्ञानसाधनेतून प्रत्येकाने बळ घेतले पाहिजे.
बालपणी मातृछत्र हरपले. गरिबीबरोबर जातीय अपमान सोसावा लागला. आत्मकथनात त्यांनी शाळेतील वेदनादायक आठवणी नोंदवल्या आहेत. इतरांपासून वेगळे बसावे लागे; गोणपाट स्वतः घरी न्यावे लागे. शिपाई नसल्यास पाण्यावाचून राहावे लागे. तरी त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. अन्यायाच्या अनुभवांना पुढे त्यांनी संशोधन आणि परिवर्तनाची दिशा दिली.
वडील रामजींनी त्यांच्या विद्याप्रेमाला भक्कम आधार दिला. अवांतर वाचनासाठी पैसे उसने घेऊन, प्रसंगी मुलींचे दागिने गहाण ठेवून पुस्तके आणली. लहानशा घरात शांत अभ्यासासाठी रात्री दोन वाजता उठवले. भाषाभ्यासाची शिस्त लावली. वडिलांनी शिकवले तसे कोणाही मास्तरांनी शिकवले नाही, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. पुढे ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ आईवडिलांच्या स्मृतीला अर्पण करून त्यांच्या त्यागाचे मोल जपले.
दापोलीतील सुरुवातीनंतर साताऱ्यातील कॅम्प स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण झाले. ७ नोव्हेंबर १९०० रोजी गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये इंग्रजी पहिलीत प्रवेश घेतला. मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूलमधून १९०७ मध्ये मॅट्रिक, एल्फिन्स्टन कॉलेजमधून १९१२ मध्ये बी.ए. पूर्ण केले. बडोद्याच्या शिष्यवृत्तीवर कोलंबिया विद्यापीठात जाऊन १९१५ मध्ये एम.ए. मिळवली. पुढे राष्ट्रीय उत्पन्नाविषयी संशोधन केले. प्रांतिक वित्तव्यवस्थेवरील संशोधनासाठी कोलंबियाने १९२७ मध्ये पीएच.डी. प्रदान केली. दरम्यान, लंडनमधील अध्ययनातून १९२१ मध्ये एम.एस्सी., ग्रेज इनमधून १९२२ मध्ये बॅरिस्टरची पात्रता आणि १९२३ मध्ये डी.एस्सी. मिळवली. कार्याचा गौरव म्हणून कोलंबियाने १९५२ मध्ये मानद एलएल.डी., उस्मानिया विद्यापीठाने १९५३ मध्ये मानद डी.लिट. दिली. अखेरच्या दोन पदव्या कर्तृत्वाचे सन्मान होते.
या पदव्यांमागील प्रवास संघर्षमय होता. विवाह, मुलांचे संगोपन आणि आर्थिक जबाबदाऱ्यांमध्येही शिक्षणाचे ध्येय जपले. १९१७ मध्ये आर्थिक अडचणी आणि बडोद्याच्या सेवेत परतण्याच्या आवश्यकतेमुळे लंडनमधील शिक्षण अपूर्ण राहिले. नोकरीतील बचत आणि सहकार्याच्या आधाराने १९२० मध्ये परत जाऊन शिक्षण पूर्ण केले. रमाबाईंची साथ आणि कुटुंबाचा त्याग या ज्ञानसाधनेचा आधार होता.
परिश्रमांविषयी ते म्हणाले, “कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो.” ११ सप्टेंबर १९३८ च्या भाषणात इंग्लंडमधील आठ वर्षांचा अभ्यास दोन वर्षे तीन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी चोवीस तासांपैकी एकवीस तास अभ्यास केल्याचे त्यांनी सांगितले. हे त्यांचे आत्मनिवेदन त्यांच्या ज्ञानतळमळीची जाणीव करून देते. त्यातील प्रेरणा म्हणजे एकाग्रता, सातत्य आणि वेळेचा सदुपयोग. शिक्षणात खंड पडला म्हणजे भविष्य संपत नाही; मार्ग शोधून पुन्हा सुरुवात करता येते.
पुस्तके त्यांच्या जगण्याची सोबत होती. १९१७ मध्ये स्वतंत्रपणे पाठवलेली पुस्तके वाहून नेणारे जहाज बुडाले. मौल्यवान ग्रंथसंग्रहाच्या हानीचे दुःख झाले; तरी संग्रह पुन्हा उभारला. ‘राजगृह’ निवासाबरोबर अध्ययनाचे केंद्र बनले. वंचितांनी जपलेल्या दुर्मीळ हस्तलिखितांचे कौतुक करताना ते म्हणाले, “ही ज्ञानाची लालसा त्यावेळच्या समाजास भूषणावह आहे, याबद्दल दुमत होणे शक्य नाही.”
विद्येतून स्वतःची क्षमता विकसित करणे, स्वावलंबी होणे आणि स्वाभिमानाने जगणे हे व्यक्तिगत ध्येय होते. मात्र, ज्ञानाचा उपयोग व्यक्तिगत सुखापुरता ठेवला नाही. वंचितांना शिक्षण, समान हक्क आणि सन्मानाचे जीवन मिळावे, हे सामाजिक ध्येय स्वीकारले. विद्यार्थ्यांनी क्षमता सिद्ध करावी आणि समाजाला स्वतंत्र, समर्थ व सन्माननीय बनवण्यासाठी नेतृत्व करावे, असा संदेश १९४६ च्या पत्रात दिला.
त्यांची संपूर्ण कारकीर्द या ध्येयाचे प्रकटीकरण होती. अर्थशास्त्रातून चलनव्यवस्था, सार्वजनिक वित्त आणि शेतीच्या प्रश्नांची चिकित्सा केली. कायद्याच्या ज्ञानातून हक्कांच्या संरक्षणाचे मार्ग मांडले. महाडच्या सत्याग्रहातून सार्वजनिक साधनांवरील समान हक्काचा प्रश्न उभा केला. जातिव्यवस्थेच्या अध्ययनातून अस्पृश्यताविरोधी संघर्षाला दिशा दिली. पत्रकारितेतून वंचितांचे प्रश्न मांडले; अध्यापनातून विद्यार्थ्यांना घडवले.
कामगार सदस्य म्हणून कामगारकल्याण, सामाजिक सुरक्षा, रोजगार, जलसंपदा आणि वीजविकासाच्या प्रश्नांसाठी अभ्यास वापरला. कायदामंत्री म्हणून हिंदू कोड बिलातून स्त्रियांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून समता आणि मूलभूत हक्कांना घटनात्मक संरक्षण देण्यात योगदान दिले. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, सिद्धार्थ व मिलिंद महाविद्यालयांतून पुढील पिढ्यांसाठी शिक्षणाच्या संधी निर्माण केल्या. शिक्षणसंस्थांचा उद्देश केवळ आर्थिक प्रगतीपुरता नव्हता. विद्यार्थ्यांचा बौद्धिक, नैतिक आणि सामाजिक विकास व्हावा; श्रेष्ठकनिष्ठतेच्या परंपरेतून मुक्त होण्याची आणि फसवणूक ओळखण्याची क्षमता निर्माण व्हावी, अशी त्यांची अपेक्षा होती.
या कार्यातून त्यांची मूल्यदृष्टी स्पष्ट होते. परंपरेपेक्षा मानवी हिताची कसोटी लावली. विषमता नाकारून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय प्रमाण मानले. बुद्ध, कबीर, फुले यांच्यापासून प्रेरणा घेतली. सत्यशोधनाला स्वातंत्र्य हवे; विचार स्वीकारण्यापूर्वी तपासावा आणि विरोधी भूमिकाही समजावी, असा आग्रह धरला. बुद्धधम्मातील विवेक, करुणा आणि मानवतेचा स्वीकार केला.
विद्येला विनय आणि शीलाची जोड आवश्यक मानली. माणसाला अन्नाप्रमाणेच ज्ञानाची गरज आहे; विनय म्हणजे लीनता किंवा लाचारी नव्हे, असा त्यांचा विचार होता. शिक्षण दुधारी शस्त्र असल्याने चारित्र्यहीन सुशिक्षित व्यक्ती धोकादायक ठरू शकते, असा इशारा दिला. गरिबांचे अहित करणारे ज्ञान त्यांना मान्य नव्हते. पदवीबरोबर वास्तविक ज्ञान आणि भक्कम पात्रता मिळवावी, हा विद्यार्थ्यांना उपदेश होता. स्वावलंबन, सदाचरण आणि समाजकार्यावरील निष्ठा यांना त्यांनी जीवनात महत्त्व दिले. ज्ञानाने माणुसकी वाढावी आणि दुर्बलांच्या उन्नतीला हातभार लागावा, अशी त्यांची अपेक्षा होती.
औपचारिक शिक्षणानंतरही प्रत्येक जबाबदारी त्यांना नव्या अध्ययनाकडे घेऊन गेली. अनुभवातून प्रश्न, वाचनातून संदर्भ, चिंतनातून भूमिका आणि कृतीतून विचारांची कसोटी, अशी ज्ञानसाधना सुरू राहिली. अखेरच्या काळातील ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातूनही ती दिसते. महापरिनिर्वाणानंतर प्रकाशित झालेल्या ग्रंथातून पुढील पिढ्यांचे शिकणे सुरू राहिले.
त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय दखलही घेतली गेली. कोलंबियाने मानद डॉक्टरेट देताना समाजसुधारणा आणि मानवी हक्कांच्या कार्याचा गौरव केला. ब्रिटनमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांचा अर्धपुतळा आहे. कॅनडातील विद्यापीठीय परिसंवादांत त्यांच्या समतेच्या विचारांचा अभ्यास होतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयातील जयंती कार्यक्रमात विषमता दूर करण्याच्या विचारांना उजाळा मिळाला. ज्ञानसाधना आणि मानवसेवेमुळे अनुयायांसाठी ते ज्ञानाचे प्रतीक ठरले.
आज विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून अखंड शिकण्याची वृत्ती घ्यावी. नियमित अभ्यास, अवांतर वाचन, लेखन आणि पुरावे तपासून मत बनवण्याचा विवेक विकसित करावा. अपयश आल्यास कारणे समजून मार्गदर्शन घ्यावे. ताण वाढल्यास विश्वासू व्यक्तीशी किंवा समुपदेशकाशी बोलावे. ज्ञानाबरोबर प्रामाणिकपणा आणि इतरांच्या सन्मानाचे भान जपावे. विद्यार्थ्यांनी तुलना करण्याऐवजी स्वतःची प्रगती तपासावी. शिकलेला विषय स्वतःच्या शब्दांत सांगता येतो का, त्याचा उपयोग करता येतो का, हे पाहावे. शिक्षकांनी प्रश्नांना प्रोत्साहन द्यावे; पालकांनी गुणांबरोबर प्रयत्नांचेही मोल ओळखावे. या आधारातून विद्यार्थ्याला एकटेपणावर मात करता येते आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून अडचणींतून मार्ग शोधण्याची उमेद मिळू शकते.
शिक्षणखर्च, रोजगाराची अनिश्चितता आणि भेदभावाची जबाबदारी विद्यार्थ्यावरच टाकता येणार नाही. परवडणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृहे आणि सुरक्षित वातावरण ही शासनाची व संस्थांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी अडचणींची माहिती संघटितपणे मांडावी. पुराव्यांसह लोकशाही मार्गाने उत्तरदायित्व मागावे. अभ्यासगट, पुस्तकपेढ्या आणि परस्पर मदतीतून भेदांच्या भिंती ओलांडणारी बंधुता वाढवावी.
रेल्वेचे इंजिन सर्व डब्यांना सोबत घेऊन पुढे जाते, तसे शिकलेल्या माणसाने समाजाला पुढे नेले पाहिजे, हा बाबासाहेबांनी दिलेल्या उदाहरणाचा बोध आहे. “झगडा, आणखी झगडा; त्याग करा, आणखी त्याग करा” या त्यांच्या आवाहनातील जिद्द अभ्यासात आणि लोकशाही कृतीत उतरली पाहिजे. स्वतःचे भविष्य घडवताना इतरांनाही सन्मानाने पुढे जाण्याची संधी मिळवून देणे, हीच त्यांना कृतीतून वाहिलेली आदरांजली ठरेल.
आज देशाच्या विविध भागांत तरुणांच्या ओठांवर “जय जय, जय जय, जय भीम!” हा नारा उमटतो आहे. या नाऱ्याला आत्मनिर्भरतेच्या जाणिवेची जोड मिळावी. आपली प्रगती घडवण्यासाठी दैवी हस्तक्षेपाची वाट पाहण्याऐवजी आपणच शिकले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत आणि सदैव जागरूक राहिले पाहिजे. लोकशाही टिकवण्याची जबाबदारीही आपलीच आहे. धर्माच्या नावाने भेदभाव आणि भ्रम पसरवणाऱ्या प्रवृत्तींना विवेकाने प्रश्न विचारले पाहिजेत. अशा प्रवृत्तींचे अनुसरण केल्यास माणसामाणसांतील विश्वास आणि देशाचे हित धोक्यात येऊ शकते. “आम्ही सर्व भारतीय आहोत” ही एकोप्याची भावना, समान हक्कांचा आदर आणि परस्पर सहकार्य यांतून देशाच्या विकासाची वाट प्रशस्त होईल. विद्यार्थी बाबासाहेब पुढच्या पिढीला हाच विवेकाचा मार्ग देत आहेत—ज्ञानाने स्वतःला घडवा, बंधुतेने माणसे जोडा आणि जागरूक नागरिक म्हणून लोकशाही जपा.
देशाला परिवर्तनाची दिशा दाखवणारे समतेचे मार्गदर्शक - ज्ञानदीप डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रा. डॉ. सुभाष वाघमारे -प्रकाशक, साहित्यवेल प्रकाशन सातारा ९८९०७२६४४०
by Team Satara Today | published on : 06 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा