साखरवाडी : फलटण तालुक्यात ट्रान्स्फॉर्मर चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. नुकतीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुपनवर वस्ती, साखरवाडी येथे बुधवारी रात्री 100 के.व्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्यांनी खाली पाडून त्यामधील ऑईल सांडून तांब्याच्या तारांची चोरी केल्याचे समोर आले आहे.
चोरीस गेलेला ट्रान्स्फॉर्मर कोळपे वस्ती व रुपनवर वस्ती या दोन वस्त्यांमध्ये तसेच या परिसरातील शेतीच्या कृषी पंपांसाठी वीजपुरवठा करण्यासाठी महत्त्वाचा होता. सध्या सर्वत्र आडसाली ऊस लागणीचे काम सुरू आहे. तसेच बाजरी, मका व सोयाबीन पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंपाचा वापर वाढला आहे. अशातच ट्रान्स्फॉर्मर चोरीमुळे या भागातील शेतकर्यांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे. या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.
यापूर्वीही फलटण तालुक्यात ट्रान्सफॉर्मर चोरीच्या अनेक घटना घडल्या असून अजूनही चोरट्यांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे या प्रकारांना आळा बसत नसल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे. महावितरण व पोलिस प्रशासनाने या चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने पाहून तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.