सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने एकत्रितपणे लढण्याची भूमिका स्पष्ट केली असली, तरी जागावाटपाचा तिढा कायम आहे. विशेषतः जिल्हा कॅटेगरीतील दहा जागांवर कोणत्या घटक पक्षाला किती वाटा मिळणार, यावरून महायुतीतील राजकीय ताकदीची खरी कसोटी लागणार आहे. ठरावांचे संख्याबळ जागावाटपाचा आधार ठरणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केल्याने आता या दहा जागांमध्ये भाजप ‘मोठा भाऊ’ ठरणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनंतर साताऱ्यात महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत निवडणूक एकत्रितपणे लढविण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली असली, तरी कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या, यावर अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या घटक पक्षांकडून सुरू असलेल्या जागांच्या दाव्यांना आता ठरावांच्या आकडेवारीची जोड मिळाली आहे.
जिल्हा बँकेच्या ११ तालुक्यांतील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या मतदारसंघांमध्ये स्थानिक राजकीय समीकरणे निर्णायक राहणार आहेत. मात्र, जिल्हा कॅटेगरीतील दहा जागांसाठी पक्षनिहाय ठरावांचे संख्याबळ तपासले जाणार आहे. ५ ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर कोणत्या पक्षाकडे किती ठराव आहेत, याचे चित्र अधिक स्पष्ट होईल. त्यानंतरच जागावाटपाचे सूत्र निश्चित केले जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर भाजपकडून अधिक जागांचा दावा होणार का, राष्ट्रवादी आणि शिवसेना त्याला कितपत प्रतिसाद देणार, हा महायुतीच्या चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. केवळ पक्षाची संघटनात्मक ताकद किंवा नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा नव्हे, तर प्रत्यक्ष ठरावांचे संख्याबळ जागावाटपाचा निकष ठरणार असल्याने प्रत्येक घटक पक्षाला आपले संख्याबळ सिद्ध करावे लागणार आहे.
दरम्यान, आमदार जयकुमार गोरे बैठकीला अनुपस्थित राहिल्याने महायुतीतील मतभेदांच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, गोरे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी कामांच्या नियोजनात व्यस्त असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, असे देसाई यांनी स्पष्ट केले. महायुतीमध्ये कोणताही वाद नसून सर्व घटक पक्ष एकत्र असल्याचा दावाही त्यांनी केला.
आता ५ ऑक्टोबरनंतर समोर येणाऱ्या ठरावांच्या आकडेवारीवर महायुतीच्या जागावाटपाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे दहा जागांमध्ये कोण किती जागा मागतो, यापेक्षा कोणाकडे किती ठराव आहेत, यालाच निर्णायक महत्त्व प्राप्त झाले आहे. या आकडेवारीत भाजप आघाडीवर राहिल्यास ‘मोठ्या भावा’च्या भूमिकेचा दावा अधिक ठोस होऊ शकतो; मात्र अंतिम चित्र छाननीनंतरच स्पष्ट होणार आहे.
‘मोठ्या भावा’चा दावा आकडेवारीत सिद्ध होणार?
जिल्हा बँकेच्या राजकारणात भाजपची वाढलेली सक्रियता आणि महायुतीतील जागावाटपाची चर्चा यामुळे ‘मोठा भाऊ’ कोण, हा प्रश्न पुढे आला आहे. मात्र, देसाई यांनीच ठरावांचे संख्याबळ निकष ठरविल्याचे स्पष्ट केल्याने आता राजकीय दाव्यांपेक्षा आकडे महत्त्वाचे ठरणार आहेत. ५ ऑक्टोबरनंतर कोणत्या पक्षाकडे किती ठराव आहेत, यावर दहा जागांचे गणित अवलंबून राहणार आहे.
जिल्हा बँकेत भाजप ‘मोठा भाऊ’ होणार? ठरावांच्या संख्याबळावर महायुतीचे जागावाटप; ५ ऑक्टोबरनंतरच खरे राजकीय गणित स्पष्ट होणार
by Team Satara Today | published on : 03 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा