सातारा : सातारा शहर परिसरासह जिल्ह्यात लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडले. प्रचंड उत्साह, नभांगणात फटाक्यांची आतषबाजी खरेदीसाठी गर्दी अशा मांगल्यमय वातावरणात जिल्ह्यात घरोघरी व व्यापारी पेढ्यांमध्ये लक्ष्मी पूजनाचा थाट पहायला मिळाला. अतिवृष्टीने कंबरडे मोडलेल्या बळी राजाला आर्थिक सुबत्ता लाभू दे असेच साकडे जणू सर्वांनी लक्ष्मी मातेला घातले .गुलाबी थंडीची चाहूल दारांसमोर रेखाटलेल्या सुबक रांगोळ्या, पानाफुलांच्या तोरणांनी सजलेले प्रवेशद्वार अन् आकाशकंदील, पणत्या, दीपमाळेचा झगमगाट अशा उत्साही वातावरणात शनिवारी सायंकाळी लक्ष्मी आणि कुबेर पूजन पार पडले.
यानिमित्ताने घराघरात, दुकानांमध्ये आणि कार्यालयात श्रीलक्ष्मीची, वह्या आणि खातेपुस्तिकांची मनोभावे पूजा पार पडली अन् त्यानंतर मुक्त हस्ते झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीत अवघा आसमंत न्हाऊन निघाला. पोवईनाका, शाहूपुरी, चुना गल्ली, रविवारपेठ इत्यादी भागात लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडले.
मंगळवारी सकाळीच साता-यात लक्ष्मीची मूर्ती, झेंडूची फुले आणि पूजाविधीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. दुपारनंतर मात्र, शहरातील प्रमुख रस्त्यांवर विशेषतः राजपथावर प्रचंड वर्दळ पहायला मिळाली. सायंकाळी सहाच्या नंतर लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू झाली. शहर-उपनगरातील दुकानेही आकर्षकरित्या सजविण्यात आली. मांगल्याचे प्रतीक असलेले दिवे उजळले अन् पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या कुटुंबीयांनी सायंकाळी मुहूर्त साधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लक्ष्मीचे पूजन केले.
सातारा शहरातील व्यापाऱ्यांनी दुपारनंतर व्यवहार थांबवून दुकाने सजविण्यास प्राधान्य दिले. दुकानांपुढे पाण्याचा सडा टाकून आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. मुहूर्ताची वेळ जसजशी जवळ येत होती, तशी व्यापारी-कर्मचाऱ्यांची पूजेची लगबग वाढत होती. लक्ष्मीपूजनासोबतच प्रथेप्रमाणे चोपड्या-वह्या, खातेपुस्तिका आणि दुकानाची साग्रसंगीत पूजा पार पडली. यानिमित्ताने पोवईनाका रस्त्यासह सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले.