सातारा : घरातील वाद क्षणात इतका विकोपाला गेला की, एका १७ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला. गोडोली परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेत वडिलांनी मुलीच्या डोक्यात लाकडी बॅटने प्रहार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. प्रहारानंतर गंभीर जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे घटनेनंतर घरातील रक्ताचे डाग आणि अन्य पुरावे पुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला.
पोलीस तपासाच्या संदर्भाने समोर आलेल्या माहितीवरून आणि सूत्रांच्या संदर्भाने संबंधित मुलगी आई-वडील व कुटुंबीयांसह गोडोली परिसरात राहत होती. तिच्या वर्तनावरून काही दिवसांपासून घरात वारंवार वाद होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.पुरुषोत्तम संपत कदम असे संबंधित वडिलांचे नाव असून ते मूळचे चंचळी, ता. कोरेगाव येथील आहे . ते शिक्षक असून त्यांच्या पत्नी शीला कदम या सुद्धा शिक्षकच आहेत .
शनिवारी रात्री टीव्ही बंद करण्यावरून घरात वाद झाला. त्यानंतर मोबाईलच्या वापरावरूनही वाद वाढला. मुलगी आक्रमक झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिला आवरण्याचा प्रयत्न केला. याचवेळी तिच्या हातातील लाकडी बॅट वडिलांनी हिसकावून घेत तिच्या डोक्यात प्रहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. प्रहारानंतर मुलगी घरातच कोसळली. मात्र, घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली नाही. रविवारी सकाळी ती घरात बेशुद्धावस्थेत असल्याचे सांगण्यात आल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करताना मुलगी ज्या ठिकाणी पडली होती, तो परिसर स्वच्छ करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
कुटुंबीयांकडून सांगण्यात आलेली माहिती आणि घटनास्थळावरील परिस्थिती यामध्ये तफावत आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून घराची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यानंतर वडील आणि आईची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. दिवसभराच्या चौकशीनंतर वडिलांनी मुलीच्या डोक्यात बॅटने प्रहार केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनेनंतर पुरावे पुसण्याचा प्रयत्न का करण्यात आला, तसेच मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
कौटुंबिक वाद विकोपाला; वडिलांच्या बॅटच्या प्रहारात अल्पवयीन मुलीचा मृत्यू, गोडोलीतील धक्कादायक घटना
घटनेनंतर पुरावे पुसण्याचाही प्रयत्न, पोलिस तपासात वडिलांची कबुली
by Team Satara Today | published on : 04 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा