राणंद हद्दीत अल्पवयीन नातवाने केला आजीचा खून

देवऋषी तांदळे याला अटक ; अल्पवयीन मुलगा ताब्यात

by Team Satara Today | published on : 12 September 2025


दहिवडी, दि. 12  :  मार्डी, ता. माण येथील हिराबाई दाजी मोटे (वय 75) यांचा 17 वर्षांच्या नातवानेच डोक्यात दगड घालून खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, येडेनिपाणी येथील देवऋषी आनंदा दत्तात्रय तांदळे याला अटक केली आहे. याबाबत गुन्हा नोंद झाल्यापासून, दोन दिवसांत पोलिसांनी त्याचा छडा लावला.

आजी आपली आई आणि बहिणीचा छळ करून, त्यांना उपाशी ठेवत असल्याने, हिराबाई मोटे यांचा काटा काढण्याचे अल्पवयीन नातवाने ठरवले होते. त्यासाठी तो येडेनिपाणी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील देवऋषी आनंदा तांदळे याच्याकडे गेला. आजीचा खून करायचा आहे, काय करावे लागेल, असे नातवाने तांदळे याला विचारले. त्यावर, खून सोबत कोणालाही बरोबर न्यायचे नाही, नाही तर पोलिसांना समजते, असे तांदळे याने सांगितले.

त्याप्रमाणे नातवाने सोमवारी (दि. 8) मध्यरात्री हिराबाईंची म्हैस सोडून दिली. म्हैस शोधण्यासाठी त्या जवळच राणंद हद्दीत गेल्या. तेथे नातवाने हिराबाईंच्या डोक्यात बॅट मारून, त्यांना खाली पाडले आणि डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी नातवाने तांदळे याच्याकडे जाऊन, त्याला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांना माझा संशय येईल का, हे समजण्यासाठी देवाला कौल लावा, असे नातवाने सांगितले. तांदळे याने कौल लावून, सांगितले की, देवाने उजवा कौल दिला आहे. तू केलेला प्रकार पोलिसांना समजणार नाही. तू बिनधास्त राहा, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दहिवडी पोलिस ठाण्याचे सपोनि दत्तात्रय दराडे यांनी तांत्रिक बाबी तपासून आणि नातवाच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत नातवाने घडलेला सर्व प्रकार सांगून, खुनाची कबुली दिली. देवऋषी आनंदा तांदळे याला पोलिसांनी अटक केली असून, सपोनि दराडे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडाळ्यात दोन वाहनांना धडक देऊन ट्रेलर पलटी
पुढील बातमी
आबईचीवाडीत मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी

संबंधित बातम्या