कास : आपल्या फुलांच्या अलौकिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जागतिक वारसास्थळ कास पठाराचा हंगाम सुरू झाला आहे. शुक्रवारी ईद-ए-मिलाद, शनिवारी अनंत चतुर्दशी व रविवार अशा सलग आलेल्या सुट्यांमुळे कासला तीन दिवसांत हजारो पर्यटकांनी भेट देऊन तेथील पुष्प सौंदर्याचा आस्वाद घेतला.
दाट धुके, गार वारे आणि सततच्या पावसामुळे कास पठारावर पहिल्या टप्प्यात काही दुर्मिळ फुले उमलण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कासचा अधिकृत हंगाम वन विभाग व कास कार्यकारी समितीच्या वतीने चार सप्टेंबरपासून सुरू करण्यात आला. पर्यटकांना सुटीच्या दिवशी www.kas.ind.in या वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग करून येण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे आलेल्या पर्यटकांपैकी निम्मे पर्यटक ऑनलाइन बुकिंग करून आले होते, तरीही बुकिंग न करून आलेल्या पर्यटकांची संख्या ही मोठी होती.
समितीच्या वतीने पर्यटकांच्या सोयीसाठी १३२ स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून, इतर सुविधाही पुरवण्यात येत आहेत. सद्यःस्थितीत पठारावर अनेकविध दुर्मिळ रंगीबेरंगी फुलांचे दर्शन होऊ लागले असून, पाऊस, दाट धुके, वारा यामुळे वातावरण कुंद आहे. सध्या पठारावर टूथब्रश, दीपकांडी, चवर, पंद, अभाळी, भुईकारवी, सोनकी, तेरडा या फुलांना तुरळक स्वरूपात बहर आला असून, पठारावरील फुले पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत.
पठारावरील लाल गुलाबी तेरडा, गेंद, सीतेची आसवे, चवर, कुमुदिनी फुलांना बहर आला असून, उर्वरित इतर फुलेही बहरण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटक मोठ्या संख्येने कासला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटतानाचे चित्र आहे.