वॉशिंग्टन : कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AIचा वापर जगभरात वेगाने वाढत असताना त्याला होणारा विरोधही आता तीव्र होताना दिसत आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये AI विरोधी आंदोलकांनी OpenAIच्या कार्यालयात प्रवेश करून आंदोलन केल्याची घटना समोर आली आहे. या आंदोलनानंतर 13 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
अहवालानुसार, OpenAIच्या वॉशिंग्टन डीसी येथील लॉबिंग कार्यालयात हे आंदोलन सुमारे दोन तास सुरू होते. आंदोलकांचा मुख्य आक्षेप AI तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबाबत आहे. AI कंपन्या ज्या वेगाने नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहेत, त्या तुलनेत सरकारकडून नियम आणि सुरक्षेच्या उपाययोजना पुरेशा वेगाने होत नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.
AIविरोधातील आंदोलन हे केवळ एका कंपनीपुरते मर्यादित राहिलेले नाही. अमेरिकेत आणि युरोपमध्ये AIमुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत वेगवेगळ्या गटांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. सर्वात मोठी चिंता नोकऱ्यांबाबत आहे. AIमुळे अनेक कामे स्वयंचलित होऊ शकतात आणि त्याचा सर्वाधिक परिणाम काही पारंपरिक कार्यालयीन आणि सुरुवातीच्या स्तरावरील नोकऱ्यांवर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मार्च 2026 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आंदोलकांनी OpenAIपासून Elon Musk यांच्या xAIपर्यंत मोर्चा काढला होता. AIचा विकास आणि त्याचा वेग कमी करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती.
तरुणांना नोकऱ्यांची सर्वाधिक चिंता
AIविरोधातील नाराजीमध्ये रोजगाराचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. किंग्स कॉलेज लंडनच्या 2026 मधील एका अभ्यासानुसार, ब्रिटनमधील सुमारे 10 पैकी 7 लोकांना AIमुळे नोकऱ्यांवर होणाऱ्या परिणामाची चिंता आहे. सुमारे 57 टक्के लोकांना AIमुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढू शकते, असं वाटतं. तर 22 टक्के लोकांच्या मते AIमुळे नोकऱ्या इतक्या वेगाने कमी होऊ शकतात की त्यातून सामाजिक अस्थिरताही निर्माण होऊ शकते.
युवक आणि करिअरची सुरुवात करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ही भीती आणखी मोठी आहे. अभ्यासात जवळपास 10 पैकी 6 लोकांनी AIमुळे सुरुवातीच्या स्तरावरील व्हाइट-कॉलर नोकऱ्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली.
कलाकार आणि लेखकांचाही AIला विरोध
AIविरोधाचा आणखी एक मोठा मुद्दा कॉपीराइट आणि कलाकारांच्या हक्कांचा आहे. AI मॉडेल तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डेटा लागतो. इंटरनेटवर उपलब्ध असलेली पुस्तके, फोटो, लेख, संगीत आणि इतर कंटेंट AIच्या प्रशिक्षणासाठी वापरला जाऊ शकतो. त्यामुळे लेखक, कलाकार आणि इतर क्रिएटर्सचा प्रश्न आहे की त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या कामाचा वापर AI मॉडेलच्या प्रशिक्षणासाठी केला जात असेल, तर त्यांना त्याचा मोबदला का मिळू नये?
युरोपमध्ये हा मुद्दा गंभीर झाला आहे. AI आणि कॉपीराइटसंदर्भातील नियम अधिक स्पष्ट करण्याची गरज असल्याची भूमिका युरोपीय संसदेत मांडण्यात आली आहे. AI कंपन्यांनी त्यांच्या मॉडेलच्या प्रशिक्षणासाठी कोणता डेटा वापरला, याबाबत अधिक पारदर्शकता असावी आणि कलाकारांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, अशी मागणी होत आहे.
लेखकांनी पुस्तक छापलं, पण पाने ठेवली कोरी
AIविरोधातील आंदोलनाचा एक वेगळा प्रकार ब्रिटनमध्ये पाहायला मिळाला. सुमारे 10 हजार लेखकांनी AIविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध केला. त्यांनी अशा पुस्तकाचं प्रकाशन केलं ज्यावर लेखकांची नावं होती, मात्र पुस्तकातील पाने कोरी ठेवण्यात आली होती.
लेखकांनी तयार केलेल्या साहित्याचा परवानगीशिवाय AI प्रशिक्षणासाठी वापर सुरू राहिला, तर भविष्यात मानवी सर्जनशीलतेचं काय होणार, हा प्रश्न या आंदोलनातून उपस्थित करण्यात आला. संगीत क्षेत्रातही अशाच प्रकारचा विरोध झाला. हजाराहून अधिक कलाकारांनी AIविरोधात एक म्युझिक अल्बम प्रसिद्ध केला. या अल्बममध्ये पारंपरिक गाणी किंवा रेकॉर्डिंगऐवजी रिकाम्या स्टुडिओमधील आवाजांचा वापर करण्यात आला. कलाकारांच्या कामाचा AI प्रशिक्षणासाठी होणाऱ्या वापराविरोधात हा प्रतीकात्मक निषेध होता.
आता डेटा सेंटरही आंदोलनाचं कारण
AIविरोधातील आंदोलनाचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे AI डेटा सेंटर. मोठे AI मॉडेल चालवण्यासाठी प्रचंड संगणकीय क्षमता आवश्यक असते. त्यासाठी मोठमोठी डेटा सेंटर उभारली जात आहेत. मात्र ही केंद्रे चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज आणि पाण्याची गरज असते.
यामुळे अमेरिकेतील काही स्थानिक समुदायांमध्ये नाराजी वाढत आहे. डेटा सेंटरमुळे मोठ्या प्रमाणावर वीज वापरली जाते, पाण्याचा वापर वाढतो, पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो आणि काही भागांमध्ये वीजेच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, अशी स्थानिक नागरिकांची चिंता आहे.
काही ठिकाणी डेटा सेंटरमुळे होणाऱ्या आवाजाचाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मोठ्या कंपन्यांच्या AI प्रकल्पांसाठी स्थानिक जमीन, पाणी आणि वीज यांचा वापर होत असेल, तर त्याचा स्थानिक नागरिकांना नेमका फायदा किती होणार, असा सवालही केला जात आहे.
AIविरोधाचा मुद्दा आता फक्त नोकऱ्यांपुरता नाही
AIचा विरोध करणाऱ्या आंदोलनांकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते, हा विरोध फक्त ‘AIमुळे नोकरी जाईल’ इतकाच मर्यादित राहिलेला नाही. नोकऱ्या, कलाकारांचे कॉपीराइट हक्क, AI कंपन्यांची पारदर्शकता, डेटा सेंटरचा वीज-पाणी वापर, पर्यावरण आणि सरकारचे नियम या सगळ्या मुद्द्यांवरून अमेरिका आणि युरोपमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. AI तंत्रज्ञानाचा वेग दिवसेंदिवस वाढत असताना त्याचा फायदा आणि त्याची किंमत यांच्यात समतोल कसा साधायचा, हा प्रश्न आता कंपन्यांसोबतच सरकार आणि सामान्य नागरिकांसमोरही उभा राहिला आहे.