सातारा : १०९ इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा लाइट इन्फंट्री यांच्या वतीने दि. २३ मे रोजी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, शेंद्रे येथे सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्यात माजी सैनिक, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन व तक्रार निवारण करण्यात येणार आहे. पेन्शन व SPARSH संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी विविध रेकॉर्ड ऑफिसचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. महसूल व पोलिस प्रशासनाशी संबंधित तक्रारींसाठी विशेष स्टॉल उभारण्यात येणार असून, संबंधित विभागांचे अधिकारी नागरिकांशी थेट संवाद साधतील.
याशिवाय खासगी क्षेत्रातील रोजगार संधी, रोजगार मार्गदर्शन, आरोग्य तपासणी तसेच विविध बँका, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा रोजगार कार्यालयाचे माहिती स्टॉल्स उपलब्ध असतील.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० वाजता नोंदणी व तक्रार निवारण प्रक्रियेसह होणार असून, १०.३० वाजता मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. माजी सैनिकांनी ओळखपत्र, आवश्यक कागदपत्रांच्या प्रती तसेच रेजिमेंटची कॅप, कोट व मेडलसह उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशांत कदम यांनी केले आहे.