मराठा आरक्षणाचे आंदोलन चिरडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

भूमिका स्पष्ट करण्याची राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते शशिकांत शिंदे यांची मागणी

by Team Satara Today | published on : 31 August 2025


सातारा : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायचे असेल तर राज्य शासनाने तसेच जाहीर करावे. द्यायचे असेल तर ते कशा पद्धतीने देणार हे जाहीर करावे. मात्र उपसमितीच्या नावाखाली राज्य सरकार वेळ काढत आहे. मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या संदर्भात दोन महिन्यापूर्वी सूचना दिली होती. त्यावेळीच राज्य शासनाने त्यांना चर्चेला का बोलावले नाही ? मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका संदिग्ध असून हे आंदोलन चिरडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

राष्ट्रवादी शरद पवार गटाने घेतलेल्या काही भूमिकांची माहिती देण्यासंदर्भात आमदार शशिकांत शिंदे यांनी सातार्‍यात पत्रकारांशी राष्ट्रवादी भवनामध्ये संवाद साधला. यावेळी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील इत्यादी उपस्थित होते. 

शिंदे पुढे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार निश्चित भूमिका स्पष्ट करत नाही. तामिळनाडू पॅटर्न प्रमाणे मराठा आरक्षणाचा कोटा वाढवणार आहे का ? वाढवायचा असेल तर केंद्र शासनाकडे तसा पाठपुरावा केला का ? आरक्षण ओबीसी कोट्यातून देणार असाल तर तसे जाहीर करा. अन्यथा स्वतंत्र घटनात्मक प्रयोजन काय याची तरी माहिती द्या. राज्य सरकार विरोधी पक्षांना सुद्धा चर्चेला बोलवत नाही आणि त्यावर भूमिका सुद्धा मांडत नाही, अशी तक्रार शशिकांत शिंदे यांनी केली. 

मुंबईला जाणार्‍या सर्व प्रमुख रस्त्यांची कोंडी करून आंदोलकांना तेथेच थांबवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे मुंबई आणि लगतचा सर्व परिसर आंदोलकांच्या गर्दीने व्यापून गेला आहे. जसजसे दिवस उलटत जातील तसतशा आंदोलकांच्या भावना तीव्र होत जाणार आहेत. राज्य शासन मराठा व ओबीसी यांच्यात भांडणे लावण्याचा उद्योग करत आहे. उप समितीच्या नावाखाली केवळ वेळ काढला जात आहे. मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या संदर्भात दोन महिन्यापूर्वीच सूचना दिली होती त्यावेळी सरकारने कोणतीच भूमिका जाहीर केली नाही. दोन वर्षांपूर्वीच मराठा आंदोलकांनी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेवर चिकित्सक पद्धतीने अभ्यास करून आरक्षण दिले असते तर ही वेळ आली नसती. त्यामुळे राज्य शासन संदिग्ध भूमिका घेत असून मराठा आरक्षणाचे आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला. 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढणार असून या निवडणुका महायुतीच्या आघाडीतून लढायच्या की स्वतंत्रपणे लढायच्या या संदर्भात लवकरच महाविकास आघाडीचे तिन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहेत. सातारा जिल्ह्यात शंभर टक्के जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुका लढणार असून सातारा शहरातही महाविकास आघाडीचे स्वतंत्र पॅनल टाकणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

येत्या 10 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात संपूर्ण राज्यात या कायद्याच्या विधेयकाची होळी करण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवराय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्व आंदोलन होऊन आपली भूमिका मांडणार आहेत. तसेच या कायद्याला आपला विरोध प्रकट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दिनांक 14 व 15 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी पक्षाचे विशेष अधिवेशन नाशिक येथे होत असून या अधिवेशनामध्ये शेतकर्‍यांची कर्जमाफी व शेतकर्‍यांच्या आर्थिक अडचणी या विरोधात नाशिक येथे मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

सातारा जिल्ह्यातील पोलीस राज्य शासनाचे नोकर असल्याप्रमाणे वावरत आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये अवैध धंदे, मटका, चक्री जुगार तसेच कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. या संदर्भात आम्ही पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली होती. मात्र अद्याप त्यात कोणताही फरक पडलेला नाही. त्यामुळे लवकरच पोलिसांच्या या वेगळ्या वागणुकीच्या विरोधात आम्ही मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघात प्रकरणी महिला कार चालकावर गुन्हा
पुढील बातमी
भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्य चळवळीतील व राष्ट्र उभारणीतील योगदान महत्त्वाचे

संबंधित बातम्या