विकासाची भूमिका ठेवल्यानेच पाणी प्रश्न मार्गी : ना.जयकुमार गोरे

by Team Satara Today | published on : 08 January 2025


दहिवडी : मला किती मिळेल याचा कधी हिशोब केला नाही. मी केलेल्या कामातून किती लोक माझ्या पाठीशी राहतील, किती मत देतील याचा कधी विचार केला नाही. पण माझ्या मतदारसंघांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर जे मला शक्य आहे तेवढे काम पुढे गेलं पाहिजे. या मतदारसंघातला विकास पुढे गेला पाहिजे, ही भूमिका गेल्या 15 वर्षांपासून ठेवली म्हणून मला आज अभिमान आहे की माझ्या मतदार संघातला पिण्याच्या पाण्याचा, शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लागला, असे प्रतिपादन राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. 

बोराटवाडी, ता. माण येथे आयोजित आभार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अंकुश गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, अरुण गोरे, इंजि. सुनील पोरे, विकल्प शहा, हरिभाऊ जगदाळे, अतुल जाधव, माण तालुकाध्यक्ष गणेश सत्रे, खटाव तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, अर्जुन काळे, सोमनाथ भोसले, बाजार समिती सभापती विलासराव देशमुख, सरपंच दादासाहेब काळे, दिलीपभाऊ जाधव, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. जयकुमार गोरे म्हणाले, माण व खटाव तालुक्यातील जनतेमुळे हा विजय मिळवला आहे. विजयाच्या भावनाने काम करणार्‍या प्रत्येकाला हा विजय समर्पित करतो. 2019 च्या चुका 2024 मध्ये सुधारल्या. मतदारसंघामध्ये प्रचंड मेहनत केली. या मतदार संघातली माती न मती पाण्याखाली आली पाहिजे. या मतदारसंघातल्या शेतकरी बांधवांचा शेतापर्यंत बांधापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, हा संकल्प करून काम केलं. यामुळेच 50 हजार मतांचे लीड जनतेने दिले. निकालानंतर आत्मपरीक्षण करणारा, स्वतःमध्ये चुका शोधणारा आणि स्वतः मधल्या झालेल्या चुका सुधारणारा एक कार्यकर्ता म्हणून जयकुमार गोरे तुमच्या समोर आहे. समोरच्याला दोष देण्यापेक्षा मी कायम आपण कुठे चुकतो याचा विचार करतो. म्हणून आपण सर्वांनी सामान्य कुटुंबातल्या माझ्यासारख्या शेतकर्‍याच्या मुलाला या विधानसभेमध्ये जाण्याची संधी निर्माण करून दिली.

विधानसभेमध्ये काम करत असताना एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर चार -चार वेळा या जनतेने माझ्या पाठीशी आशीर्वाद उभे केले. खास करून या मतदार संघातील इंच न इंच भूमी पाण्याखाली आली पाहिजे या भागातला पाण्याचा संघर्ष कधीतरी संपला पाहिजे म्हणून या संघर्षाच्या शेवटपर्यंत किंबहुना पाणी येईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असे ना. गोरे म्हणाले.धैर्यशील कदम म्हणाले, आमदार झाल्यापासून दुष्काळी माण व खटाव तालुक्याला पाणी मिळावे यासाठी ना.जयकुमार गोरे झगडत आहेत. त्यांच्या जिद्दी ला व मेहनतीला अखेर यश आले असून तालुक्यातील बहुतांशी भागात पाणी आले. माण खटाव तालुक्यातील विकासासाठी यापुढे ही जनतेने ना.जयकुमार गोरे यांच्या पाठीशी रहावे, असे आवाहन केले. शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी विहीत वेळेत खर्च करावा
पुढील बातमी
झेडपी, पंचायत समिती यांच्यात होणार लढत

संबंधित बातम्या